करजगाव येथील रस्ता बनला मृत्यूचा सापळा

रस्त्यात वृक्षारोपण करुन संतप्त नागरिकांनी केली 'गांधीगिरी'
करजगाव येथील रस्ता बनला मृत्यूचा सापळा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

राहुरी तालुक्यातील करजगाव येथील रस्ता मुत्युचा सापळा बनला असून रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी या रस्त्यावर वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

राहुरी तालुक्यातील करजगाव येथील शेतकऱ्यांचा शेतीमाल ने-आण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. कित्येक दिवसांपासून मागणी करूनही रस्ता दुरुस्त झाला नाही. पावसाने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून पायी चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती कामे खोळंबली आहेत. सरपंच शनिफ पठाण यांनी आ. लहु कानडे यांच्याकडून निधी मंजूर करून घेतला. या रस्त्यावरील गेल्या महिन्यात झाडे काढून रस्ता मोकळा करण्यात आला. सरपंचांच्या म्हणण्यानुसार सदर रस्ता मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होणार आहे; परंतु गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर तीन ते चार फुटाचे खड्डे पडले आहे. अचानक वैद्यकीय उपचाराची वेळ आली तर पक्का रस्ता लागेपर्यंत रुग्णाच्या जिवाचे बरे वाईट होऊ शकते. नवरदेव बघण्यासाठी आलेले पाहणे रस्ता बघून लग्नाला नकार देतात अशी स्थिती आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातून रस्ता मंजूर आहे परंतु ठेकेदार तयार होत नसल्याचे सांगितले जाते. सदर रस्त्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी करजगाव येथील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.

रस्त्यावरील चिखलात वृक्षारोपण करुन करण्यात आलेल्या या 'गांधीगिरी' आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सुजाताताई सचिन लोंढे, भारतीताई राधाकिसन कोतकर, अण्णासाहेब देठे, जिल्हा दूध संघाचे संचालक नानासाहेब कोतकर, करजगाव सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब लोंढे, अशोक कोतकर, आप्पासाहेब बेंद्रे, पोपटराव कोतकर, बापूसाहेब कोतकर, शिवाजी लोंढे, बाळासाहेब गायके, जावेद पठाण, आप्पासाहेब गायके, रावसाहेब लोंढे, अरुण तुपे, अमोल कोतकर, अनिल आरंगळे, संभाजी कोतकर, शांताराम आरंगळे, सुभाष लोंढे, राजेंद्र पवार, सुनील कोतकर, लवेंद्र कोतकर, राजेंद्र कोतकर, सचिन अशोक लोंढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com