
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अनुदानातून पुणतांबा परिसरातील पुणतांबा-वाकडी-दिघी या अंदाजे 15 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील चांगदेवनगर येथील ग्रामस्थांनी दादासाहेब सांबारे यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून नाराजी व्यक्त केली.
रस्त्याची तातडीने डागडुजी केली नाही तर धडक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी ज्ञानेश्वर नन्नावरे, राजू गुंजाळ, अशोक व्यवहारे, बाळू पगारे, अरबाज शेख, इजाज शेख, हिरामण साळुंके, जॉकी भालशंकर, बापू गोराणे, रवि शुक्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अंदाजे साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामाची 3 जानेवारी 2009 मध्ये सुरुवात झाली होती व 2 जानेवारी 2010 मध्ये रस्ता पूर्ण झाला होता. रस्ता पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराकडे रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची 5 वर्षे जबाबदारी होती. त्या काळात रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र त्यानंतर गेल्या 6 वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आली आहे.
त्यामुळे पुणतांबा परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून जा-ये करणे अवघड झाले आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे पुणतांबा व परिसरातील 11 गावांतील महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. 11 गावांवर विकासाच्या बाबतीत जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे आता धडक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे श्री. सांबारे व वृक्षारोपणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.