नदी, नाले, ओढ्यावरील अतिक्रमणाबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी घेणार बैठक

मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल
जिल्हाधिकारी डॉ. भोसले
जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील सीना नदी पात्र, तसेच ओढे-नाले बुजवून तेथे केलेल्या बांधकामांबाबत दोषींवर कारवाईची मागणी करूनही महापालिका त्याची दखल घेत नसल्याने अखेर येथील नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयास आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिल्याने आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक येत्या मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली आहे.

नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष चंगेडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत, जनतेने केलेल्या तक्रारींवर मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही व तक्रारी तशाच प्रलंबित राहतात, असा उल्लेख करून नदीपात्रासह ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या मंजुरी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली.

परिणामी, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची स्वतंत्र बैठक मंगळवारी केवळ याच विषयासाठी आयोजित केली असून, यासाठी मनपा आयुक्त, नगररचना विभागाचे सहायक संचालक, मनपातील अतिक्रमण विभाग प्रमुख व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदारांना आवश्यक माहितीसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कागदपत्रे घेऊन बोलावले

बैठकीस स्वतः मनपाने अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे. तसेच या बैठकीची अद्ययावत टिपणी 26 तारखेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे या आदेशात स्पष्ट केले गेले आहे. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी या संदर्भातील आदेश मनपाला दिले आहेत. दरम्यान, या बैठकीची माहिती तक्रारदार चंगेडे यांनाही देण्यात आली असून, त्यांनाही या बैठकीस बोलावण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com