रिक्षा चालकांना दीड हजारांच्या मदतीची प्रतिक्षा

नगर शहरासह दक्षिण जिल्ह्यात साडेतीन हजार रिक्षाचालक उपेक्षीत
रिक्षा चालकांना दीड हजारांच्या मदतीची प्रतिक्षा
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजारांची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत अजून देखील रिक्षा चालकांना मिळाली नाही. नगर शहरासह दक्षिण जिल्ह्यातील 3 हजार 520 परवानाधारक रिक्षाचालक या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. नगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली असून अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे रिक्षा चालकांवर सरकारी मदतीची वाट पाहण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी रिक्षा चालकांना दीड हजार रूपयांची मदत जाहीर केली होती. मदतीची घोषणा होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही रिक्षा चालकांच्या बँक खात्यावर दीड हजार रूपये आलेले नाहीत. नगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नगर शहरासह नगर तालुका, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यातील तीन हजार 520 रिक्षाचालकांची नोंद आहे.

या सर्व रिक्षा चालकांची फक्त आकडेवारी मागविण्यात आली असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. अजून मदतीचा एक रूपया देखील मिळाला नाही. कधी मिळणार आहे याची माहिती देखील नगर कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही. संचारबंदीमुळे परवानाधारक रिक्षा चालकांना व्यवसाय राहिलेला नाही. त्यात सरकारने दिलेले आश्वासन देखील पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रिक्षा चालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

सरकारने जे अनुदान घोषित केलेले आहे. ते अपूर्ण आहे, सरकारने किमान पाच ते सात हजार रूपये अनुदान प्रत्येक रिक्षा चालकांना द्यावे, अशी रिक्षा चालकांची मागणी आहे.

कार्यालयाकडे नोंद असलेले तीन हजार 520 परवानाधारक रिक्षाचालक आहेत. त्यांना मिळणार्‍या दीड हजार रूपये अनुदानासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून फक्त आकडेवारी मागविण्यात आली आहे. अजून अनुदानाबाबात कोणतीच माहिती आलेली नाही.

- गणेश पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com