अधिकार्‍यांच्या कामगिरीवर महसूलमंत्र्यांची नाराजी

श्रीरामपुरात आढावा बैठक : जिल्हाधिकार्‍यांनीही धरले धारेवर
अधिकार्‍यांच्या कामगिरीवर महसूलमंत्र्यांची नाराजी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील करोना रुग्णांची सद्य स्थितीची आकडेवारी विचारली असता दोन अधिकार्‍यांकडे असलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आढळल्याने

जिल्हाधिकार्‍यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना धारेवर धरले. वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रांताधिकार्‍यांकडे चुकीची आकडेवारी मांडण्यात आली. यामुळे महसूलमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्यातील करोना रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकेल.

एप्रिल महिना हा खूपच धोक्याचा आहे. प्रत्येकाला झोकून देऊन काम करावे लागेल. तरच करोनाची साखळी तुटू शकेल, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी अनिल पवार, खा. सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहु कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी अनिल पवार यांनी तालुक्यातील करोना स्थितीचा आढावा वाचन करताना त्यांच्याकडून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 428 वाचण्यात आली तर ना. थोरात यांनी आरोग्य अधिकार्‍यांना विचारले असता तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी 692 असल्याचे सांगितले. त्यावेळी ना. थोरात यांनी सांगितले की, दोनशे रुग्णांच्या आकड्यांची तफावत आहे, ही तफावत चिंता करण्यासारखी आहे. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी शहर व तालुका यांची स्वतंत्र वर्गवारी करण्यास सांगितले. त्यावेळी ती वर्गवारीही करता आली नसल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी शहर, तालुका व ग्रामीण वैद्यकीय अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, ग्रामीण रुग्णालयात करोना रुग्णांसाठी सध्या पाहिजे तशी व्यवस्था होत नाही. गरिबांना मोफत भोजन, पाण्याची व्यवस्था करावी. सर्वसामान्य माणसांची अडवणूक न होता त्यांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत. अधिकार्‍यांनी आकडेवारी देताना चुकीची माहिती का देतात? तुमच्या तुमच्यात समन्वय नसल्यामुळे खोटा प्रकार पहावयास मिळत आहे.

आ. लहू कानडे म्हणाले की, गरीब लोकांना मोफत उपचार मिळावेत म्हणून 50 बेडची व्यवस्था आमदार निधीतून केली होती. त्याचप्रमाणे अजून 100 बेडची व्यवस्था करोना फंडातून करावी, अशी मागणी केली.

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या शहरात कोविड रुग्णालय असणे गरजेचे आहे. त्यासाठी मंगल कार्यालयाची पहाणीही केली आहे.

उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, आंबेडकर वसतीगृहात 482 बेडची कॅपेसिटी असताना त्यात 242 बेड शिल्लक असतानाही काही रुग्णांंना दाखल करुन घेण्याऐवजी त्यांना परत पाठवले जाते ही गंभीर बाब असून या बैठकीत वैद्यकीय अधिकारी खोटी माहिती देतात. कोणाचीही अडवणूक न करता गरीब लोकांना बेड उपलब्ध करुन द्यावे.

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. भाजीपाला विक्रेते ऐकत नसल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी तुम्हाला अधिकार दिले आहेत. कोणी ऐकत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असे स्पष्ट केले. गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागातील माहिती दिली.

ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटीलेटरचा वापर नाही

करोनाची परिस्थिती भयानक होत असताना व्हेंटीलेटर, ऑक्सीजन, बेडची मागणी सगळ्याच ठिकाणांहून होत असताना ग्रामीण रुग्णालयात दोन व्हेंटीलेटर असताना त्याचा या काळात वापरच करण्यात येत नसल्याचे काल कळाले. व्हेंटीलेटरचा वापर करणारा शिक्षीत अधिकारी नसल्यामुळे ते पडून असल्याचे वैद्यकीय अधिकारी बंड यांनी सांगितले. त्यावेळी ते व्हेंटीलेटर अन्य रुग्णालयात देऊ का? यावर आ. कानडे म्हणाले, व्हेंटीलेटर येथून हलवू नका उलट आम्हाला ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख पद भरा व अन्य पदांची भरती करावी अशी मागणी केली.

टी शर्ट घालून आल्याने डॉक्टरला बाहेर काढले

शहरातील आकडेवारी विषद करत असताना पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्याही आकडेवारीत तफावत आढळली. तसेच मंत्र्यांच्या बैठकीला येताना टी शर्ट घालून आले. तुम्ही बैठकीला थांबू नका. मात्र वैद्यकीय अधिकारी आपली बाजू मांडतच होते यावर जिल्हाधिकारी संतापले व म्हणाले तुम्हाला मराठीत सांगितले, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही ताबडतोब बैठकीतून बाहेर जा! त्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर जावे लागले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com