
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या शेवगावच्या महसूल पथकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास तालुक्यातील हसनापूर शिवारात घडली. या घटनेत परिविक्षाधीन तहसीलदार राहुल गुरव व तीन कर्मचारी जखमी झाले असून गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन विष्णू ढाकणे, विठ्ठल लक्ष्मण ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे व अंगद अर्जुन ढाकणे या चौघांवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे, सरकारी कामात अडथळा आणल्याचे कारणावरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसनापूर शिवारातून अवैध गौण खनिजाची बेसुमार वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार छगनराव वाघ यांना मिळाली असता त्यांच्या सुचनेनुसार परिविक्षाधीन तहसीलदार गुरव या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अव्वल कारकून रवींद्र सानप, तलाठी सचिन लोहकरे व सोमनाथ आमने यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी गेले असता तेथे गौण खनिज मुरूमाची वाहतूक करणार्या ट्रॅक्टर चालकाला थांबण्याचा इशारा केला असता तो ट्रॅक्टर थांबवून पसार झाला. थोड्या वेळात तिथे अर्जुन ढाकणे हा दुचाकी (एमएच 17 बीके 8618) घेऊन तेथे आला व उर्मट भाषेत बोलू लागला.
त्याला परिचय दिला असता तो म्हणाला की आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. तहसील कार्यालयात ट्रॅक्टर नेणार नाही त्यावेळी तेथे विठ्ठल ढाकणे व अंगद ढाकणे हे दोघे एका दुचाकीवर काठ्या व लोखंडी गज घेऊन आले. हे दोघे तेथे येताच त्यांनी पथकातील अधिकार्यांना शिवीगाळ करत ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पथकाने ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काठ्या व लोखंडी गजाने पथकाला मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्यावेळी विठ्ठल ढाकणे याने, यांना जिवंत सोडत नाही, असे म्हणत दगडी पाटा गुरव यांच्या दिशेने भिरकावला. यावेळी प्रसंगावधान राखून तलाठी लोहकरे यांनी बाजूला ओढल्याने गुरव वाचले मात्र पाटा त्यांच्या डाव्या हाताला लागून मुका मार लागला. तेव्हा घटनास्थळी जमा झालेले लोकमध्ये पडले.
दरम्यान विठ्ठल ढाकणे हा ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. यावेळी सानप यांच्या डाव्या हातावर मार लागला तर लोहकरे यांना पाठीवर व उजव्या खांद्यावर तसेच आमने यांना डाव्या खांद्यावर कोपरावर दोन्ही गुडघ्यावर उजव्या हाताला जखमा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48 (7) (8) नुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अर्जुन ढाकणे यास अटक केली आहे.