
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विविध कारणांमुळे दहा वर्षांपासून खंडित असलेल्या महसूल क्रीडा स्पर्धा या वर्षी होत आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज रविवारपासून (दि. 12) दोन दिवस वैयक्तिक, तसेच सांघिक खेळ स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात क्रीडा स्पर्धा होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या नियोजनातून या स्पर्धा होत आहेत. पारनेर-श्रीगोंदे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे या स्पर्धांच्या क्रीडाविषयक कामाची जबाबदारी देण्यात आली. जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्रीरामपूर प्रांताधिकारी अनिल पवार व राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्याकडे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये धावणे, थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, पोहणे, बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे.
सांघिक खेळामध्ये रिले, खो- खो, व्हॉलिबॉल, क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. सांस्कृतिक स्पर्धेसाठी प्रत्येक विभागातून चार संघ राहणार आहेत. प्रत्येक संघाला 40 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवारी होणार आहे. जिल्हास्तरावरील विजयी खेळाडूची निवड नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी होणार आहे नाशिक विभागाच्या स्पर्धा धुळे जिल्ह्यात आयोजित केल्या जाणार आहेत.
चारशे खेळाडूंचा सहभाग
जिल्हाधिकार्यांपासून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहायक, तलाठी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कोतवाल अशा सर्व संवर्गांतील चारशे खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत अहमदनगर साऊथ वॉरिअर्स, नगरी टायगर्स, अहमदनगर रॉयल, प्रवरा पँथर असे चार विभाग तयार करण्यात आले आहेत.
संघनिहाय वर्गवारी
साऊथ वॉरियर्समध्ये कर्जत, जामखेड, श्रीगोंदे, पारनेर या तालुक्यांचा समावेश आहे. नगरी टायगर्समध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नगर व नेवासे तालुक्यांचा समावेश आहे. अहमदनगर रॉयलमध्ये शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर आणि राहुरी या तालुक्यांचा समावेश आहे. प्रवरा पँथरमध्ये कोपरगाव, राहाता, संगमनेर आणि अकोले या तालुक्यांचा समावेश आहे.