महसूलमंत्र्यांनी पकडलेल्या वाळू उपसा बोटी प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

वाळू उपसा करणार्‍या 18 लाखांच्या दोन यांत्रिक बोटी साहित्यांसह जप्त
महसूलमंत्र्यांनी पकडलेल्या वाळू उपसा बोटी प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी दौर्‍याप्रसंगी म्हाळापूर शिवारात पकडून दिलेल्या दोन बोटी प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात नेवाशातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 18 लाख रुपये किंमतीच्या या दोन बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.

महसूलमंत्र्यांनी पकडलेल्या वाळू उपसा बोटी प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
चक्क! महसूल मंत्र्यांनीच पकडून दिल्या वाळू उपसा करणार्‍या बोटी

याबाबत नेवासा खुर्दचे सर्कल सुनील भाऊसाहेब लवांडे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 23 ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांनी फोनवर कळविले की, म्हाळापूर गावच्या शिवारात प्रवरासंगम ते मंगळापूर रोडच्या बाजूला निवृत्ती आसाराम म्हस्के यांच्या मालकीच्या म्हाळापूर येथील गट नं. 48/2 मध्ये वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी बोट व साहित्य आहेत. तुम्ही सदर ठिकाणी कार्यवाहीसाठी जावे असा आदेश दिल्याने मी, नायब तहसीलदार किशोर सानप, तलाठी भारत दत्तात्रय म्हस्के, कोतवाल निवृत्ती विठ्ठल माळी यांना सदर बाबत माहिती देवून दोन पंचांना घेवून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जावून पाहणी केली असता तिथे 6 लाख रुपये किंमतीची एक लोखंडी यांत्रिक बोट आढळली. त्यामध्ये यांत्रिक इंजिन, पाईप व इतर वाळू काढण्यासाठी लागणारे साहित्य, 4 घमीले वाळू मिळाली.

दुसरी एक मोठी तीन कप्पे असलेली यांत्रिक बोट इंजिनसह आढळली. त्यात एक लोखंडी पाईप, बांगडी पीव्हीसी पाईप, 4 लोखंडी टिपाडे, 4 घमिले वाळू असे बोट व साहित्य मिळून 12 लाख रुपये किंमत. वरील दोन्ही बोटी मिळून एकूण 18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करुन जप्त केला.

सदर बोट व साहित्य संदिप कचरु म्हस्के, सुनील धोत्रे, हिरामन धोत्रे, सचिन चिखले (चौघेही रा. नेवासा) यांच्या मालकीचे असल्याचे निवृत्ती आसाराम म्हस्के यांनी सांगितले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील चौघांवर भारतीय दंड विधान कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com