तहसीलदारांची महसूलमंत्री ना. विखे यांनी काढली खरडपट्टी

भाजपच्यावतीने अकोल्यात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे जंगी स्वागत
तहसीलदारांची महसूलमंत्री ना. विखे यांनी काढली खरडपट्टी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अनियमित धान्य वाटप व रेशन घोटाळा प्रकरणावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तहसीलदार सतिश थेटे यांची आज अकोले दौर्‍या दरम्यान चांगलीच खरडपट्टी काढली.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना विखे पाटील प्रथमच अकोले येथे आले असता भाजपच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे आगमनाचे स्वागत केले. माजी आमदार वैभवराव पिचड यांनी ना. विखे पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष व भाजपचे उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी स्वस्त धान्य पुरवठयातील घोटाळा व अनियमित पणा यासंदर्भात महसूलमंत्री ना. विखे पाटील यांनी निवेदन दिले. यानंतर माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही यापूर्वी काळ्या बाजारात जाणारे स्वस्त धान्य पकडून दिले होते. याबाबतही माजी आ. पिचड यांनी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले. तहसीलदार थेटे यांनी याबाबत माहिती दिली.

त्यावर पिचड यांनी तहसीलदार खोटी माहिती देत आहेत असा आक्षेप घेतला व महसूलमंत्री ना विखे पाटील यांनी तालुक्यातील स्वस्त धान्य वितरणातील अनागोंदी कारभारा बाबत माहिती देताच महसूलमंत्र्यांनी तहसीलदारांना ही बाब गंभीर असून आपण याबाबत लक्ष घालावे अन्यथा मला पुढील कारवाई करायला भाग पाडू नका असे सुनावले. ना विखे पाटील यांनी यावरच न थांबता जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती माळी यांना थेट संपर्क साधत तातडीने अकोलेला येण्याचे आदेश दिले.

निळवंडे धरणाचे जलपूजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे जिल्ह्यातील नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अकोले भाजप कार्यालयात माजी आमदार वैभवराव पिचड, पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख,अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक विजय पवार,महिला तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे आदींनी त्यांचे स्वागत केले.

अकोले नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी व सर्व नगरसेविका यांच्या वतीने महसूलमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com