
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यात 11 गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मिळविलेला विजय हा परिवर्तनाची नांदी असून, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जनतेच्या मनातील सरकारला मिळालेले पाठबळ असल्याची प्रतिक्रीया महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत 11 गावांच्या ग्रामपंचायतींवर महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी मोठे यश संपादन केले. या ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे, भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची प्रक्रीया ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि समाजातील वंचित घटकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ थेट मिळत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर सामान्य माणसाचा विश्वास या निवडणूकीच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया गतीने पुढे जात आहेच, परंतू यापेक्षाही मागील चार महीन्यात राज्य सरकारने सामान्य माणसाच्या हिताच्या घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम या निवडणूकीच्या माध्यमातून दिसून आला.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला या निवडणूकीतून जनतेने एकप्रकारचे पाठबळच दिले आहे, याकडे लक्ष वेधून तालुक्यात गावोगावी सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार दबाव झुगारून संघटीतपणे विकास प्रक्रीयेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले ही परीवर्तनाची सुरूवात असल्याचे निकालातून स्पष्ट झाले असल्याचे मंत्री ना. विखे पाटील म्हणाले.
शिर्डी मतदारसंघातील गावांमध्ये विकासाच्या कामांना आपण नेहमीच प्राधान्य दिले. प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा हाच आपला प्राधान्यक्रम असून भविष्यातही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची काम करण्यास कटीबध्द राहाणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.