
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
जिल्ह्यातील वेगवेगळया क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले जे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच परदेशातील उद्योजक म्हणून यशस्वी झालेल्या सर्वांना एकत्र बोलावून त्यांनी जिल्ह्यात औद्योगिकरणासाठी योगदान द्यावे, त्यासाठी त्यांना जागा पाहिजे असेल तर श्रीरामपूर एमआयडीसीत जागा देवू त्याचबरोबर अन्य सहकार्य करुन औद्योगिकरण वाढवून तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिले.
येथील भगतसिंग चौकात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर आदी उपस्थित होते. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार माजी नगरसेवक रवि पाटील मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आला.
ना. विखे म्हणाले, जिल्ह्यात औद्यागिककरण वाढले पाहिजे, पर्यटनाला चालना दिली पाहिजे म्हणून जिल्हाधिकार्यांसमोर दोन तीन पर्याय दिले आहेत. त्यासाठी आपण जिल्ह्यातून शिक्षण घेवून अन्य ठिकाणी यशस्वी उद्योजक, इंजिनिअर तसेच अन्य क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या़ंची एक बैठक बोलावणार आहोत. त्यांना जिल्ह्यासाठी काय योगदान देणार? यासाठी आपणास जागा पाहिजे तर जागा देवू, तसेच अन्य जी मदत लागेल ती देवून पण जिल्ह्यातील औद्योगिकरणाला चालना देवून तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात खूप मोठे पर्यटन आहे. शिर्डीपासून, शनीशिंगणापूर, मोहटा देवी, देवगड, नेवासा येथील ऐतिहासिक ज्ञानेश्वर मंदिर याठिकाणी मोठमोठे तिर्थक्षेत्र तयार होवून नवीन मॉडेल तयार करता येईल. आयटीपार्कसारखे प्रकल्प असतील तर त्यांना जागा देवू, निधी देवू तसेच पाहिजे ते सहकार्य करु, निसर्ग ठिकाणे खूप आहेत मात्र आपल्याकडे सुविधा नाहीत. कळसुबाईचे शिखर असेल, रतनगड, हरिश्चंद्र गड, डोंगरगण यासारखी एैतिहासिक ठिकाणे आहेत. ही स्थळे आजपर्यंत विकसीत झालेली नाही कारण तेथे सुविधा नाहीत. मात्र त्यासाठी आपण सुविधा पुरवून ही नैसर्गिक ऐतिहासीक क्षेत्र आहेत त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन ना. विखे यांनी दिले.
माजी नगरसेवक पाटील यांनी शहरातील समस्या मांडल्या असता ना. विखे पा. म्हणाले की, तुम्ही चांगले काम करा प्रस्ताव द्या शहराचा नकाशा द्या त्यासंदर्भात आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही. कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कायरकर्तं व माजी नगरसेवक उपस्थित होते.
आता सर्वसामान्यांना 500 रुपयात वाळू
यापुढील चार महिन्यात तुमच्या घराच्या बांधकामाला वाळू पाहिजे असल्यास फक्त ऑनलाईन अर्ज करा, तुम्हाला वाळू मिळेल. तुम्हाला आता ठेकेदाराकडे जाण्याची गरज नाही. जी वाळू या अगोदर 5 हजार रुपये ब्रासने मिळत होती तीच वाळू आता सर्वसामान्य नागरिकांना केवळ 500 रुपये ब्रासने मिळणार असल्याचे ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी सांगितले.