पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे राहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधला आ. थोरात यांच्यावर निशाणा
पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे राहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका

राहाता |वार्ताहर| Rahata

स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. आम्हांला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्या तालुक्यातील जनता विकासाला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका. पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे राहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका, अशी टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. थोरात यांचेवर नाव न घेता केली.

राहाता शहरातील विविध विकास कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच शहीद जवान अनिल निकाळे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजाकरिता दफनभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पाटील यांचा समाजातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकूंदराव सदाफळ, साहेबराव निधाने, मौलना रफीक, भाऊसाहेब जेजूरकर कैलास सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, प्रा. निकाळे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसिलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी तुषार आहेर, बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, शेती महामंडळाच्या जमिनीचा विनियोग समाजहितासाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केल्यामुळेच साकुरीच्या पाणीपुरवठा योजनेला जागा उपलब्ध करून देता आली. आता या जागेवर औद्योगिक वसाहतीचा प्रकल्प उभा राहील. याची सर्व प्रक्रीया सुरू झाली आहे. तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिंद्रा, टाटा आणि अन्य आयटी कंपन्या समवेत प्राथमिक बोलणे झाले आहे. या कंपन्यांनी प्रकल्प उभारणीस सकारात्मकता दर्शवली असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

शिर्डी येथे कार्यान्वित झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ही उत्तर नगर जिल्ह्याकरिता मोठी उपलब्धी आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी 100 कोटी रूपयांचा निधी लवकरच मंजूर होईल. विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात. केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाहीत. अनेकांना महसूल मंत्री पदाची संधी मिळाली. पण जिल्ह्यासाठी काहीच करणे त्यांना सुचले नाही. जे स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत ते इकडे येवून सल्ले देतात.

विकासाच्या गप्पा मारतात. पण आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. सामाजिक जबाबदारीतून इथे विकास साध्य होत आहे. या विकासाला गालबोट लावण्याचे काम सुरू झाले आहे. पण पाहुणे म्हणून या भाडेकरी बनू नका इथे जागा नाही. व्यक्तिद्वेश करून तालुक्यातील जनतेचे प्रपंच उध्वस्त करू नका, आमच्याकडे वाळू आणि क्रशरचे माफीयाराज नाही. महसूल विभागात काही कठोर निर्णय केले यामुळे अनेकांची चिडचिड वाढली असल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले, राहाता शहरात निधी उपलब्ध करून देत विकासाची प्रक्रीया पुढे नेणारे मंत्री विखे पाटील हे खरे विकास पुरुष आहेत. नेवासा तालुक्यात पाच वर्षात पाच कोटी मिळतात. राहाता तालुक्यात एका वर्षांत दहा कोटीचा निधी मिळतो हे विखे यांच्या कार्यप्रणालीचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com