
पुणे |प्रतिनिधी| Pune
अहमदनगरच्या नामकरणाचा अंतिम निर्णय झालेला नाही. बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत, हे महत्त्वाचे आहे, असे सांगत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. याविषयी मी गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं 22 डिसेंबर रोजी निधन झालं.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची केसरीवाडा येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलताना मुक्ता टिळक यांच्या सभागृहातील कामकाजातील आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, नगरच्या नामकरणाचा अंतिम निर्णय झालेला नाही. अनेक वर्षे आपण औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्याची मागणी ऐकत आलो. मात्र नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची जास्त गरज आहे. जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा विनाकारण केली जात असल्याचे यावेळी विखे पाटील म्हणाले. गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलेल. त्यांच्या भावना होत्या, त्यांचे व्यक्तिगत मत होते ते त्यांनी व्यक्त केले. प्रश्नाचे विनाकारण काही लोक राजकारण करत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत बसून आम्ही यावर चर्चा करू, असे देखील राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.
राज्यातील अनेक जिल्हे मोठे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा केली जात आहे. जिल्हा विभाजन करून आपण काय साध्य करत आहोत. ठाणे जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास तेथील भौगोलिक परिस्थिती वेगळी होती.त्यामध्ये आदिवासी विभाग होता.त्याच आपण पालघर जिल्ह्यात विभाजन केलं. सातपेक्षा अधिक महापालिका एकाच जिल्ह्यात आहेत. मात्र तशी परिस्थिती नगर जिल्ह्याची नसल्याचे त्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करायला आम्ही घेतला आहे. औद्योगिक पर्यटन या जिल्ह्याच्या क्षमतेतून रोजगार निर्मिती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे देखील यावेळी विखे पाटील म्हणाले.