महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करण्याचा भाजपचा जाणीवपूर्वक प्रयत्न- ना. थोरात

महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करण्याचा भाजपचा जाणीवपूर्वक प्रयत्न- ना. थोरात
ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले काम करत आहे. नुकतेच रिझर्व बँकेच्या अहवालातही चांगली अर्थव्यवस्था सांभाळणारे व कामकाज करणारे सरकार म्हणून महाराष्ट्राचा गौरव झाला आहे. मात्र धार्मिकतेच्या नावावर सातत्याने संभ्रम निर्माण करणे, सरकारला काम करू न देणे असा जाणीवपूर्वक प्रयत्न भाजपा करत असून महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संगमनेर मध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, हनुमान चालीसा, भोंगे या विषयावरून काही प्रवृत्ती महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भोंगेंबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याचे पालन करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कोणी कितीही भोंगे वाजवले तरी राज्यघटनेचा समतेचा भोंगाच जास्त वाजणार आहे. भाजपाला नैराश्य आले असून अनेक दिवस ते तारखा देत आहेत. या सर्व त्यांच्या तारखा खोट्या ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. सरकार अत्यंत चांगले काम करत असून विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात चांगल्या कामामुळे महाराष्ट्र सरकार अग्रक्रमावर आहे.

करोना संकट, नैसर्गिक चक्रीवादळे, अशातून ही अर्थव्यवस्था भक्कम पणे सावरली आहे. मात्र काही लोकांना सवंग प्रसिद्धी हवी असते आणि मग ते असे उद्योग करतात. त्यांनी कसेही वागावे आणि त्यांनी मोकळीक द्यावी असे नाही. मग पोलीस पोलिसांचे काम करतात असे सांगताना महाविकासआघाडी भक्कम आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेकरिता अत्यंत चांगले काम करत आहे. नैराश्यातून गोंधळ घालणार्‍या या प्रवृत्तींना महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवेल, असेही नामदार थोरात म्हणाले.

Related Stories

No stories found.