रमजान ईद हा बंधुभाव व प्रेमाचा संदेश देणारा सण - ना. थोरात

रमजान ईद हा बंधुभाव व प्रेमाचा संदेश देणारा सण - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भारतीय परंपरा ही विविधतेने नटलेली असून प्रत्येक सण हे एकात्मतेचा व आनंद देणारे असतात. सर्व धर्मियांनी सर्व सण एकत्र साजरे करणे ही समृध्द भारतासाठी अभिमानाची व आनंदाची बाब असून पवित्र रमजानच्या उपवासानंतर येणारा रमजान ईद हा सण एकात्मता, बंधुता व प्रेमाचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, गणेश मादास, गुलाबराव ढोले, किशोर कालडा, शकील पेंटर, शफी तांबोळी, गजेंद्र अभंग, मिलिंद कानवडे, धनंजय डाके, किशोर टोकसे, निखील पापडेजा, लुकड्या पहिलवान, सुभाष सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, हिरालाल पगडाल, लाला बेपारी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ना. थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले आहे की उपवास हा ईश्वराजवळ जाण्याचा मार्ग आहे. उपवास व प्रार्थना केल्याने मानवी जिवनात पवित्रता वाढते. रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणारा आहे. हा सण एकत्रित साजरा केल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत होतो. समता व बंधूभाव वाढवणारा असा हा रमजानचा पवित्र सण आहे. अनेक धर्म व पंथ असूनही एकात्मता ही आपली ताकद व सुसंस्कृती आहे. अशी ही भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. संगमनेरात सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात ईद हा सण साजरा करतात. सर्व समाज बांधव एकमेकांच्या सुःख, दुःखात सहभागी होतात. हे एकात्मतेचे, समतेचे व कौटुंबिक वातावरणही संगमनेरकरांची वेगळी ओळख निर्माण झाली असून यावेळी त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, मनाची शुध्दी करणारा पवित्र असा रमजान महिना हा जीवनात उत्साह व आनंद वाढविणारा आहे. हीच उर्जा घेऊन आपण सर्वजण काम करत असतो. धर्म हा माणसे जोडण्यासाठी असतो. ईश्वर हा एकच असून आज रमजान ईद व अक्षय तृतीया हे दोन एकत्र सण आले हा योगायोग आहे. यानिमित्ताने सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हे सर्वच सण साजरे केले आहेत हे आनंददायी आहे. ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात ‘एक तालुका एक परिवार’ ही संकल्पना राबविली जात असून संगमनेर तालुका हा सुरक्षित, सुसंस्कृत व वैभवशाली ठरला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहरातील व तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com