ना. थोरात यांनी केली म्हाळादेवी येथील जलसेतू कामाची पाहणी

ना. थोरात यांनी केली म्हाळादेवी येथील जलसेतू कामाची पाहणी

अकोले |प्रतिनिधी| Akole

दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतूच्या कामाच्या पहाणी राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून या जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे उजव्या कालव्यावरील भव्य दिव्य जलसेतू (क्वाडक्ट) ची पाहणी नामदार थोरात यांनी केली. यावेळी समवेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ड माधवराव कानवडे, माजी अध्यक्ष सिताराम पा. गायकर ,जि प सदस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे ,दादापाटील वाकचौरे ,अशोकराव भांगरे, भास्करराव आरोटे ,बाळासाहेब नाईकवाडी, नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे ,अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नामदार थोरात यांनी म्हाळादेवी येथील जलसेतू व उजव्या कालव्यावरील रात्रंदिवस सुरू असलेली मशिनरी, यंत्रणा याबाबतचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेत हे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच या भागातील शेतकर्‍यांच्या समस्या ही नामदार थोरात यांनी यावेळी समजावून घेतल्या.

क्रेनच्या साह्याने अधिकार्‍यांसमवेत जेलसेतूवर जाऊन नामदार थोरात यांनी ही पाहणी केली. याबाबत निळवंडे धरणाच्या विश्रामगृहावर ही अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. या प्रसंगी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांची कामे रात्रंदिवस सुरू आहेत . येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर च्या काळामध्ये दोन्ही कालव्यांना पाणी सोडता येईल याकरिता आपल्या सर्वांना काम करायचे आहे.

अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांनीही या कालव्याच्या कामासाठी कायम सहकार्य केले आहे . शासन स्तरावर काही अडचणी असल्यास आपण ती प्राधान्याने सोडवू. दुष्काळी भागातील जनतेला लवकरात लवकर पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. याप्रसंगी शेतकर्‍यांच्या विविध अडचणी ही नामदार थोरात यांनी समजावून घेतल्या. यावेळी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.

महसूल मंत्री ना.थोरात यांचे अकोले शहरात आगमन होताच शहरातील बुवासाहेब नवले पतसंस्था व मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.याठिकाणी अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले व कोषाध्यक्ष पदी युवा नेते विक्रम नवले यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने ना.थोरात यांच्या हस्ते नवले पिता- पुत्रांचा सत्कार करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com