भारतरत्न स्व. इंदिरा गांधी या देशाचे सर्वात खंबीर नेतृत्व - ना. थोरात

भारतरत्न स्व. इंदिरा गांधी या देशाचे सर्वात खंबीर नेतृत्व - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणार्‍या इंदिराजींच्या जीवनकार्याचे विविध पैलू आहेत. त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीच्या धाडसी निर्णयाने सामान्य माणसाला आजपर्यंत दैनंदिन लाभ मिळत आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरित व पर्यावरण क्रांती, बांगलादेश निर्मिती असे महत्त्वपूर्ण निर्णय घेणार्‍या स्व.इंदिराजींचे नेतृत्व देशासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खंबीर ठरले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अमृत उद्योग समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्त व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, प्रतापराव ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, संतोष हासे, पं.स. सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, आर. बी. रहाणे, आर. एम. कातोरे, अमित पंडित, प्रा. बाबा खरात, कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले, इंदिराजींच्या दूरदृष्टीमुळे भारतातील मध्यमवर्ग उदयास आला. 1967 साली बँकांचे राष्ट्रीयकरण करून ग्रामीण भागात बचतीचे महत्त्व निर्माण झाले तर हरितक्रांतीमुळे देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासह ग्रामीण भागातून राजकीय नेतृत्व उदयास आले. पर्यावरण संवर्धन, अणू चाचणी, गरिबी निर्मूलन यांसह बांगलादेश निर्मितीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी भारताचा दबदबा निर्माण केला. देशहिताचा प्रत्येक निर्णय घेताना त्या डगमगल्या नाहीत. भारतासाठी एक मोठे कणखर नेतृत्व त्यांनी दिले.

सध्या मात्र भाजपाप्रणीत काही संघटनांकडून पंडित नेहरू, इंदिराजी यांच्यासह राष्ट्रपुरुषांची बदनामी केली जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले व त्यांनी आर.एस.एस सारख्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. धार्मिक भावना भडकून देशात तेढ निर्माण करणार्‍या विचारांपासून राज्यघटना व लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांच्यावर कायम स्व इंदिराजी गांधी, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण, सुभाषचंद्र बोस यांसह विविध राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर प्रभाव राहिला. या राष्ट्रपुरुषांच्या विचारांची नव्या पिढीला जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने त्यांनी येथे स्व.इंदिरा गांधी यांचे स्मारक म्हणून शक्तीस्थळ उभारले. बालवयात अतिशय संवेदनशील असलेल्या इंदिरा गांधी पुढे देशाच्या कणखर पंतप्रधान बनल्या. 1971 च्या भारत - पाकिस्तान युध्दातील कणखरतेमुळे आंतराष्ट्रीय पातळीवरील कणखर नेत्या म्हणून लौकीक प्राप्त झाला असे ही ते म्हणाले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com