पठारभागातील खांबे येथे ना. थोरातांच्या हस्ते ध्वजारोहण

पठारभागातील खांबे येथे ना. थोरातांच्या हस्ते ध्वजारोहण

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

विविध परंपरा लाभलेले महाराष्ट्र राज्य हे मोठ्या कष्टातून देशात अग्रेसर ठरले आहे. भारताच्या सातत्यापुर्ण विकासात महाराष्ट्राचा कायम मोठा वाटा राहिला असून महाराष्ट्र हे राज्य सर्वात विकसित व समृद्ध असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खांबे येथील जिल्हा परिषद शाळेत महसूलमंत्री थोरात यांच्याहस्ते महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पा. खेमनर, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जि. प. महिला बालकल्याण विभागाच्या सभापती सौ. मीराताई शेटे, नवनाथ आरगडे, किरण मिंढे, इंद्रजीत खेमनर, सरपंच रवींद्र दातीर, राजहंस दूध संघाचे संचालक तुकाराम दातीर, माधव अण्णा दातीर, जयराम ढेरंगे, सचिन खेमनर, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांसह खांबा, वरवंडी परिसरातील विविध कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाने शिस्तबद्ध संचलन करुन मानवंदना दिली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन हा कायम गोरगरीब आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसमवेत साजरा केला आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खांबे येथे आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्याहस्ते झाला.

याप्रसंगी शुभेच्छा देताना नामदार थोरात म्हणाले, देशाच्या विकासात महाराष्ट्राचा नेहमी मोलाचा वाटा राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली यामध्ये हुतात्मा झालेल्यांचे सर्वांनी स्मरण कायम ठेवले पाहिजे. महाराष्ट्र ही संतांची, शुरविरांची भूमी आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश असे विभाग असलेला हा महाराष्ट्र सह्याद्री, सातपुडा सारख्या पर्वतांनी व समुद्र किनार्‍यांनी नटलेला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली. त्याच वाटचालीवर विविध सरकारांनी काम करून महाराष्ट्र हे देशातील सर्वांत प्रगत बनवला आहे. निसर्गाने नटलेल्या या पुरोगामी महाराष्ट्राने सातत्याने देशाला विचारांची दिशा दिली आहे. हीच परंपरा पुढे जपताना अखंड महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र याकरिता प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, शंकराव पा. खेमनर, सौ. मीराताई शेटे यांनीही शुभेच्छा दिल्या.

नामदार बाळासाहेब थोरात व डॉ.जयश्रीताई थोरात यांचे आगमन होताच गावकर्‍यांनी त्यांचे अत्यंत आनंदाने स्वागत केले. यावेळी महाराष्ट्रीयन पद्धतीने वेशभूषा केलेल्या मुलींनी सादर केलेली लेझीम पथक आणि गावातून नामदार थोरात यांची निघालेली मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे गावात अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Stories

No stories found.