सत्तेसाठी उड्या मारणारे दगडावर आपटले

ना. थोरात यांचा विखेंना टोला || सरकारवरील टीका नैराश्यातून
सत्तेसाठी उड्या मारणारे दगडावर आपटले

संगमनेर |प्रतिनिधी|Sangamner

सत्तेसाठी काहींनी उड्या मारल्या, पण ते खडकावर आपटले. आता त्यांना नैराश्य आले आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करत आहे, हे त्यांना देखवत नाही. नैराश्यातूनच ते सरकारवर टीका करत असल्याचा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता आमदार राधाकृष्ण विखे यांना लगावला आहे.

संगमनेर तालुक्यातील खळी येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे होते. तर व्यासपीठावर महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, लक्ष्मणराव कुटे, सभापती शंकरराव खेमनर, सुनंदाताई जोर्वेकर, मीराताई शेटे, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, संतोष हासे, रामहरी कातोरे, विष्णुपंत रहाटळ, आर. बी. रहाणे, नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, भिमाजी राहिंज, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करून तालुक्यात समृद्धी निर्माण करण्यात जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अकोले, संगमनेरच्या हक्काच्या पाण्यासाठी पूर्वेच्या लोकांनी कायमच विरोध केला. हक्काच्या पाण्यासाठी चळवळ उभी राहिली आणि हक्काचे पाणी मिळवलं. आपला विकासकामांचा रथ सुरुच राहणार आहे. आपण कधी कुणाचं नुकसान केलं नाही, कुणी विरोधी वागला तरी आपण त्याचं वाईट केलं नाही. मात्र काहींनी सत्तेसाठी उड्या मारल्या, पण ते खडकावर आपटले. राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असतांना चांगल्यावर टीका करणे हा त्यांचा स्वभावच आहे. त्यांचे दुध संघ बंद पडले आणि ते दुसर्‍यांची चौकशी करण्याचे उद्योग करत आहेत, असा चिमटा त्यांनी विखे यांचे नाव न घेता काढला.

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात मोठी मदत केली आहे. या सर्व संकटकाळानंतर संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. संगमनेर मधील साखर कारखाना, दूध संघ व इतर सहकारी संस्था अत्यंत चांगले काम करत असून यामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. समान संधी देवून कायम सर्वांचा सन्मान केला आहे. गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संगमनेरमध्ये केले जात आहे. प्रामाणिक काम जनतेचे प्रेम व नेतृत्वाचा विश्वास यामुळे आपल्याला कायम यश मिळत आहे. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. विचारांवर निष्ठा ठेवली. अडचणीच्या काळात पक्षाची धुरा सांभाळली. यामुळे पक्षात आणि राज्यात कायम सन्मान मिळतो आहे. हा सन्मान संगमनेर तालुक्यातील जनतेचा आहे.

प्रास्ताविक राजेंद्र चकोर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर सर्जेराव चकोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com