
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
काँग्रेससाठी सध्याचा काळ कठीण असला तरी आम्ही संघटन वाढवून, जिद्दीने जिल्ह्यात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवार उभे करू व जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीमार्फत लढवायच्या की स्वतंत्र याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल मंत्री थोरात शनिवारी नगर येथे होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी ना. थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीमार्फत लढवायच्या का? याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय काँग्रेसच्या उदयपूर येथील अधिवेशनात ‘एक कुटुंब एक पद’ हे धोरण ठरविण्यात आले.
याबाबत महाराष्ट्रात कशी अंमलबजावणी होणार, या प्रश्नावर बोलताना थोरात म्हणाले, पक्षात आले की लगेच पद मिळेल असे नाही. पाच वर्ष काम करा आणि नंतर पद घ्या असा त्याचा अर्थ आहे. महाराष्ट्रातील परंपरेला, सन्मानाला ठेच लागेल अशा प्रवृत्तीचे काहीजण मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणा या देशाहितासाठी आहेत. मात्र, ईडी आणि अन्य यंत्रणांचा वापर आता राजकारणासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आर्यन खानप्रकरणी अधिकार्यावर कारवाई हवी
ड्रग्ज प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी आर्यन खानला क्लीनचिट दिली, याकडे लक्ष वेधले असता मंत्री थोरात म्हणाले की, आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने कारागृहात डांबण्यात आले. याचा त्याच्या मनावर, समाजावर, कुटुंबावर काय परिणाम झाला असेल याचा विचार करावा लागणार आहे. या घटनेला जबाबदार असणार्या अधिकार्यावर कारवाई व्हायला हवी, या घटनेचा काँग्रेस निषेध करते असेही मंत्री थोरात म्हणाले.
संभाजीराजेंबद्दल काँग्रेसने प्रस्ताव दिला होता
छत्रपती संभाजीराजे यांना महाविकास आघाडीमार्फत उमेदवारी देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने शिवसेनेला दिला होता. परंतु ती जागा शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेने त्याबाबत निर्णय घेतला, असे मंत्री थोरात म्हणाले.