file photo
file photo
सार्वमत

महसूल खात्याने जप्त केलेल्या ट्रॅक्टरची चोरी

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

महसूल अधिकार्‍यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई करत जप्त केलेला ट्रॅक्टर पोलीस वसाहतीमध्ये ठेवला होता. मात्र सदर ट्रॅक्टरची चार दिवसांपूर्वी चोरी झाल्याचे समोर आले आहे. अधिकार्‍यांनी जप्त केलेल्या वाहनांची चोरी होत असल्याने विविध शंका उपस्थित केल्या जात आहे.

महसूल अधिकार्‍यांनी कारवाई करून जप्त केलेल्या वाहनांची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच चोरी झाल्याने ही चोरी शोधण्याचे आव्हान अधिकार्‍यांसमोर आहे. प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे.

महसूल कर्मचारी वाळू वाहनावर कारवाई करून जप्त केलेली वाहने पोलीस वसाहतीच्या प्रागंणात लावतात. चार महिन्यांपूर्वी कासारा दुमाला येथे वाळू वाहतूक प्रकरणी (एमएच 17 बीएक्स 3472) या क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली होती हा ट्रॅक्टर जप्त करून पोलीस वसाहतीमध्ये लावण्यात आला होता.

आपल्या ट्रॅक्टरची चोरी झाल्याचे समजल्याने या ट्रॅक्टरच्या मालकाने तहसीलदारांकडे संपर्क साधला मात्र याबाबत तहसीलदारांनी पुढची कारवाई केली नाही तीन दिवसात ट्रॅक्टर सापडला नाही तर आपण गुन्हा दाखल करू असा इशारा ट्रॅक्टर मालक गुंजाळ यांनी दिला आहे.

यापूर्वीही अशा चोर्‍या झाल्या

जप्त केलेल्या ट्रॅक्टरबाबत तहसील कार्यालयातून पोलिसांशी कुठलाही पत्रव्यवहार न करता हे ट्रॅक्टर परस्पर पोलीस वसाहतीमध्ये लावण्यात येतात. यामुळे पोलिसांना अशा वाहनांची कल्पनाही नसते. ही जबाबदारी तहसीलदारांची असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधितांना जाब विचारावा, अशी मागणी होत आहे.

या चोरीबाबत तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकार्‍यांच्या कोठडीत असलेल्या वाहनांची चोरी होत असतानाही याबाबत तहसीलदारांना माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com