सलग दुसर्या दिवशी सात महसूल मंडळात अतिवृष्टी
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मोठा खंड दिल्यानंतर नगरकरांना गणपती बाप्पा पावले आहेत. सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यात बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून 71 मंडळात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत पावसाची सरासरी 52 टक्क्यांवरून 66 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.
जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली आहे. यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील तूर, मका, चारा पिके, तर उशीराच्या सोयाबीन, कपाशी पिकाला जीवदार ठरला आहे. यासह रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकर्यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मागील लागणार आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे दक्षिण जिल्ह्यातील शेतीसाठी वरदार असणार्या विविध धरणांच्या पाणी पातळीत वाढ होतांना दिसत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पळशी, टाकळी ढोकेश्वर, पारेनर शहर, राहुरी तालुक्यातील सात्रळ, देवळाली प्रवरा, ढवळपुरी आणि संगमनेर तालुक्यातील साकूर या महसूल मंडळात शुक्रवारी अतिवृष्टी झाली असून याठिकाणी काही तासात 65 मिली मिटर पेक्षा जादा पावसाची नोंद झालेली आहे.
यासह नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी (नगर). पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळी, पळशी (पारनेर). श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, चिंबळा (श्रीगोंदा). जामखेड, अरणगाव (जामखेड). ढोरजळगाव (शेवगाव). पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी (पाथर्डी). नेवासा बु, नेवासा खु, चांदा, घोडेगाव, वडाळा, सोनई (नेवासा). राहुरी, सात्रळ, ताराबाद, देवळाली, टाकळीमियॉ, ब्राम्हणी, वांबोरी (राहुरी). संगमनेर, धांदरफळ, आश्वी, सीबलापूर, तळेगाव, समानापूर, घारगाव, डोळसणे, साकूर, पिंपळणे (संगमनेर). अकोले, वीरगाव, समशेरपूर, साकीरवाडी, राजूर, शेंडी, कोतुळ, ब्राम्हणगाव (अकोले). कोपरगाव, रवंदेख, सुरेगाव, पोहेगाव (कोपरगाव). श्रीरामपूर, बेलापूर (श्रीरामपूर). राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा (राहाता), या ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.
चार दिवस यलो अर्लट
राज्यात अनेक भागात मुसळधार
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांहून अधिक काळ रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांंपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून राज्यात बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यत व्यक्त केली असून नगर जिल्ह्यात 27 तारखेपर्यंत यलो अर्लट जारी करण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाच्या मुंबई विभागाच्या माहितीनूसार शुक्रवारी (दि. 21) पासून राज्यात कोकण, घाटमाथा, विदर्भाच्या काही भागांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. 25 सप्टेंबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार असून अधिक पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनूसार राज्यात अहमदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी पावासाचा यलो अर्लट देण्यात आला असून नगर जिल्ह्यात हा अर्लट 27 तारखेपर्यंत राहणार असल्याचे हवामान विभागाकडून कळवण्यात आले आहे.