...अन् पगारासाठी मिळाले तीन कोटी

सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा पाठपुरावा : केंद्रीय रक्षा मंत्रालयाकडून दखल
...अन् पगारासाठी मिळाले तीन कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार छावणी परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक भोसले यांनी परिषदेच्या कर्मचार्‍यांची व्यथा व प्रश्न केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे मांडल्या. तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. या पाठपुराव्याची रक्षा मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली असून कर्मचार्‍यांच्या पगारासाठी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मानधनासाठी छावणी परिषदेला 3 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

भिंगार छावणी परिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांची युनियन नाही. यामुळे कर्मचार्‍यांना आपले प्रश्न मांडता येत नाही व केंद्र सरकारवर दबावतंत्राचा वापर करता येत नाही. मात्र कर्मचार्‍यांच्या व्यथा व प्रश्नांची जाणीव असल्याने भोसले यांनी केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर पाठपुरावा केला. केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालय, प्रिन्सिपल डायरेक्टर, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रे लिहिली. त्या पत्रांचा परिणाम असा झाला, भिंगार छावणी परिषदेच्या सफाई कर्मचार्यांचा पगार आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे मानधन आदींसाठी केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून 3 कोटी रुपयांना धनादेश प्रिन्सिपल डायरेक्टर यांच्या कार्यालयात नुकताच प्राप्त झाला आहे.

एका अर्थानं भोसले यांनी कॅन्टोमेंट बोर्डाच्या असंघटित सफाई कामगारांचा कैवारी होण्याचा मान मिळविला. करोना महामारीची साथ चालू असताना जीवावर उदार होऊन छावणी परिषदेचे कर्मचारी फ्रन्टलाईन वर्कर स्वतःची पर्वा न करता सेवा देत आहेत. परंतु त्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडलेले आहे. तसे पाहिले तर मागील सहा महिन्यांपासून वेतन वेळेवर होत नाही. मासिक वेतन नसल्याने या कामगारांना गृह कर्जाचे हप्ते थकले.

महिनो-महिने पगार न झाल्यामुळे अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचार्यांची झालेली असह्य आर्थिक स्थिती आणि पेन्शनधारकांची विलंबित होणारी पेन्शन, तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतरही न मिळालेला लाभामुळे या कर्मचार्‍यांची बिकट होती. मात्र, भोसले यांनी पाठपुरावा केल्याने सध्या तरी तीन कोटी रुपये मिळाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com