शिष्यवृत्ती परीक्षेत 490 शाळांचा भोपळा

21 शाळांचा निकाल शंभर टक्के
शिष्यवृत्ती परीक्षेत 490 शाळांचा भोपळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालात घसरण झालेली असून तब्बल 490 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर अवघ्या 21 शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. दुसरीकडे पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) चा निकाल 11.43 टक्के लागला असून पूर्व उच्च प्राथमिक शाळांचा निकाल हा 15.72 टक्के लागलेला असून हा निकाल हा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकही शाळा शंभर टक्क्यांपर्यंत पोहचलेली नाही.

यंदा ऑगस्ट महिन्यांत शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. यात पूर्वी माध्यमिक शाळेतून 16 हजार 960 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. यातून 15 हजार 176 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 1 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. यात 1 हजार 735 विद्यार्थी शिष्यृत्तीला पात्र ठरले असून 13 हजार 441 विद्यार्थी नापास झाल्याने अपात्र झालेले आहेत. हा शेकडा निकाल 11.43 टक्के असून मागील वर्षी हा निकाल 18.72 टक्के होता. पूर्व प्राथमिक शाळेतून 30 हजार 88 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. यातून 26 हजार 632 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 3 हजार 456 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. यात 4 हजार 187 विद्यार्थी शिष्यृत्तीला पात्र ठरले असून 22 हजार 445 विद्यार्थी नापास झाल्याने अपात्र झालेले आहेत. हा शेकडा निकाल 15.72 टक्के असून मागील वर्षी हा निकाल 27.5 टक्के होता.

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने गुरुवारी एकत्रित जिल्ह्यातील सर्व व्यस्थापनातील शाळांची दिली आहे. यात पात्र (पास) अपात्र (नापास) विद्यार्थ्यांची तालुकानिहाय आकडेवारीचा समावेश आहे. शिष्यवृत्तीच्या आठवीच्या निकालात सर्वात कमी पात्र विद्यार्थी हे अकोला तालुक्यातील 65 असून त्याची टक्केवारी 4.87 टक्के आहे. तर सर्वाधिक पात्र विद्यार्थी हे पारनेर तालुक्यातील असून त्यांची संख्या 167 असून टक्केवारी 17.41 टक्के आहे. नगर मनपाचे 253 विद्यार्थी पात्र असून त्यांची सर्वाधिक टक्केवारी 33.69 टक्के आहे. शिष्यवृत्तीच्या पाचवीच्या निकालात सर्वात कमी पात्र विद्यार्थी हे राहुरी तालुक्यातील 84 असून त्याची टक्केवारी 5.72 टक्के आहे. तर सर्वाधिक पात्र विद्यार्थी हे संगमनेर तालुक्यातील असून त्यांची संख्या 575 असून टक्केवारी 20.79 टक्के आहे. नगर मनपाचे 291 विद्यार्थी पात्र असून त्यांची सर्वाधिक टक्केवारी 31.43 टक्के आहे.

दुसरीकडे 490 शाळांचा निकाल हा शुन्य टक्के लागलेला आहे. यात सर्वाधिक शाळा अकोले आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी 64 असून 21 शाळांचा निकाल हा शंभर टक्के आहे. यात यात सर्वाधिक कोपरगाव तालुक्यातील असून नगर, श्रीगोंदा, राहुरी, राहाता, नेवासा अणि पारनेर तालुक्यातील एकाही शाळेचा निकाल हा शंभर टक्के नाही.

शुन्य टक्के आणि कंसा शंभर टक्के शाळा

अकाले 64 (4), संगमनेर 49(3), कोपरगाव 42 (6), जामखेड 64(1), पाथर्डी 16 (1), शेवगाव 12 (4), कर्जत 21 (1), श्रीरामपूर 17 (1), पारनेर 33 (0), नेवासा 36 (0), राहाता 22 (0), राहुरी 41 (0), श्रीगोंदा 37 (0) आणि नगर 36 (0) यांचा समावेश आहे.

यंदा शुल्काचा प्रश्न

गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेवून झेडपीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क भरत होते. यंदा कोविडमुळे आणि परीक्षा शुल्क वाढल्याने जिल्हा परिषदेसमोर हा परिक्षा शुल्क भरण्याचा प्रश्न आहे. कोविडमुळे जिल्हा परिषदेेच्या उत्पन्नात मोठी घट आलेली असून यामुळे दरवर्षी करण्यात येणारी तरतूद 18 लाखांहून 8 लाख करण्यात आलेली आहे. तर परीक्षा शुल्क वाढल्याने आता 33 लाखांची गरज असल्याने झेडपीच्या शाळेतील शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा शुल्क भरण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com