सचिन दसपुते

अहमदनगर (प्रतिनिधी) -

शहरातील संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात प्रलंबित गुन्ह्यांची

संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात शहर वाहतूक शाखेचे पोलीस आले आहे. तोफखान्यांत आठ व कोतवालीत आठ अशा 16 पोलीस कर्मचार्यांवर वर्षानुवर्ष प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याची जबाबदारी वरिष्ठांनी दिली आहे.

सावेडीतील उच्चभ्रू लोकांची वसाहत, बालिकाश्रम रोड, लालटाकी, कोठला, तपोवन रोड, बोल्हेगावच्या काही भागाची जबाबदारी तोफखाना पोलीस ठाण्याकडे आहे. तसेच नगर शहरातील मध्यवर्ती भागासह केडगाव उपनगराची जबाबदारी कोतवाली पोलीस ठाण्यावर आहे. झपाट्याने वाढत असलेल्या परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यात करोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले, हाताला काम नसल्याने अनेक तरूण गुन्हेगारीकडे वळले आहे. अलिकडच्या काळात शहरात सोनसाखळी चोरी, दरोडा, रस्तालुट, घरफोड्या, दुचाकी, मोबाईल चोरी याबरोबरच खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, मारहाण आदी गुन्ह्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. अपुरे कर्मचारी, वाढते गुन्हे, अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण, त्यात करोनाचा बंदोबस्त यामुळे गुन्हे निकाली काढण्यासाठी पोलिसांना वेळ कमी पडत आहे. यामुळे दोन्ही पोलीस ठाण्यात प्रलंबित गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.

2018- 19 व 2019-20 या काळातील चोर्या, घरफोड्या, किरकोळ मारहाण असे भाग 5 चे प्रलंबित असलेले गुन्हे निकाली काढण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांची मदत घेतली जात आहे. सध्या वाहतूक शाखेतील 16 कर्मचारी तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहे. प्रलंबित असलेल्या गुन्ह्याचे कागदपत्रे त्यांच्या ताब्यात देण्यात आली असून ते काम हाती घेत तत्काल गुन्हे निकाली काढण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी त्यांना दिल्या आहेत. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले गुन्हे निकाली काढण्यात मदत होणार आहे.

सन 2018-19 मधील भाग 5 चे प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचार्यांची मदत घेतली आहे. त्यांच्याकडे चोर्या, घरफोड्या, किरकोळ मारहाण असे प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याचे काम दिले आहे.

-सुनील गायकवाड (पोलीस निरीक्षक, तोफखाना)

शहर वाहतूक शाखेतील 16 कर्मचारी प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी 15 दिवस तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयातून तात्पुरत्या स्वरूपात 15 कर्मचारी मिळणार आहे. कायम स्वरूपी 20 कर्मचारी वाढून मिळावे अशी मागणी आहे.

-विकास देवरे (पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा)

मंडप टाकूनही केला निपटारा

मध्यंतरी प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात मंडप टाकला होता. पोलीस अधिकार्यांसह, पोलीस कर्मचार्यांनी या मंडपात बसून प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिल्या होत्या. कर्मचारी त्याठिकाणी बसून काम करतात का? यासाठी मंडपात सीसीटिव्हीची नजर होती. परंतू, 15 दिवस या ठिकाणी मंडप टाकूनही पोलीस कर्मचारी त्याठिकाणी बसण्यास तयार नव्हते. तरीही मोठ्याप्रमाणात गुन्हे निकाली निघाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

वाहतूक शाखेवर ताण वाढला

शहर वाहतूक शाखेकडे अपुरे कर्मचारी आहे. पूर्वी 80 कर्मचारी होते. यात मध्यंतरी घट होऊन ते प्रमाण 61 कर्मचार्यांवर आले. त्यात 16 कर्मचारी तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात दिले आहे. यामुळे 45 कर्मचारी सध्या वाहतूक शाखेत काम करत आहे. त्यात शहरात उड्डाणपूलासह महत्वाच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या असताना वाहतूक शाखेच्या 16 कर्मचार्यांना तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे निकाली काढण्यासाठी पाठविण्यात आले आहे. यामुळे वाहतूक शाखेतील उर्वरित कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

...म्हणून गुन्ह्याचे प्रमाण वाढले

तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल होणार्या गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खास करून तोफखान्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहे. तोफखाना पोलीस ठाणे गुन्हे दाखल होण्यात एक नंबरचे पोलस ठाणे आहे. वाढती वसाहत हे एक कारण असले तरी मोठ्याप्रमाणात टेक्निकल गुन्हे या पोलीस ठाण्यात दाखल होतात. यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे वाढत असल्याने प्रलंबित गुन्ह्याची संख्या वाढली आहे. काही गुन्हे दाखल करून न घेता समझोता करून मिटण्यासारखे असतात. यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यास दाखल गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.