अकोले |प्रतिनिधी| Akole

औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने केलेली दिशादर्शक विकास कामे पहाण्यासाठी व त्यांचा आदर्श घेऊन आपल्या गावात नवीन काही करता येईल का

या भावनेने अकोले तालुक्यातील बाभुळवंडी येथील कार्यकर्त्यांनी सरपंच भास्कर पेरे पाटील यांची भेट घेतली व पाटोदा ग्रामपंचायतीने राबवलेल्या सर्व योजनांची माहिती करून घेतली. पेरे यांच्या मार्गदर्शनाने भारावलेल्या या युवकांनी आपले गाव आदर्श करण्याचा संकल्प या भेटीनंतर सोडला आहे.

पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच राष्ट्रपती पुरस्कार विजेते भास्कर पेरे पाटील यांच्या संकल्पनेतून या जिल्ह्यातील पाटोदा हे गाव विकासच्यादृष्टीने अग्रेसर आहे. लोकाभिमुख असे बहुतेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. महाराष्ट्राच्या इतर ग्रामपंचायत व गावांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा 14 वा वित्त आयोग, पेसा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन करून आपल्या संकल्पनेतून गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लावली.

महाराष्ट्रात पाटोदा ग्रामपंचायत आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवत आहे. गावाचे एकत्र सांडपाणी गावाच्या बाहेर काढून दिले आहे. गावातील ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीचा शुभेच्छा बॅनर लागला जातो, बस स्थानक मोठे आहे, गाड्यांना हवा भरण्यासाठी मशीन आहे, गावात 42 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचार्यांना थम सिस्टीम आहे, मोफत पिठाची गिरणी आहे, गावकर्यांना लाईट बिल भरावे लागत नाही, ठिक ठिकाणी थुंकण्यासाठी बेसिन आहेत,

गरम पाणी, पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी, आणि कपडे धुण्याचे पाणी मोफत मिळते, आरोग्य सुविधा आहे, शाळा आहे, गावात ठीक ठिकाणी शौचालय आहेत, कचरा एकत्र केला जातो, महिन्याच्या महिन्याला ग्रामसभा घेतली जाते, गावातील मंदिरे चांगली आहेत, गावातील सगळे रस्ते ब्लॉकच्या विटांनी बनवलेले आहेत, गावात सगळीकडे झाडे आहेत, महिलांना एकत्र कपडे धुण्याची मोठी जागा आहे, आणि ग्रामपंचायत ही डिजिटल आहे.

या गावामध्ये लोकाभिमुख ठरतील असे अनेक सार्वजनिक कामे स्वच्छ पिण्याचे पाणी, संपूर्ण गावात स्वच्छता, घनकचर्याचे व्यवस्थापन, गरम पाण्याचे व्यवस्थापन आरोग्य संवर्धनाबाबत योग्य पद्धतीने केलेली व्यवस्था असे अनेक उपक्रम राबविण्यात आल्याने महाराष्ट्रातील हजारो लोक या ग्रामपंचायतीला भेटी देत आहेत.

अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील काही तरुणांनी माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी गावात केलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा त्यांच्या समवेत केला.

भास्कर पेरे पाटील यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले हे गाव विकासच्यादृष्टीने किती पुढे आहे याची माहिती घेण्यासाठी व पाटोदा ग्रामपंचायतीने केलेली कामे आपल्या गावात करता येतील का? ही माहिती घेण्यासाठी बाभुळवांडी येथील पांडुरंग लेंडे, युवक कार्यकर्ते सुनील लोखंडे, महेन्द्र धोंगडे, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव साबळे, सचिन आढारी आदी कार्यकर्त्यांनी सरपंच भास्कर पेरे पाटील यांची भेट घेतली व पाटोदा ग्रामपंचायतीने राबवलेल्या सर्व योजनांची पाहणी केली.

या धर्तीवर आपल्या गावामध्ये देखील या पद्धतीने नियोजन करून अशाच पद्धतीने कामे करण्याचा मानस या तरुणांनी मनाशी बाळगला असून येणार्या काळात ही धडपड युवक वर्गामध्ये दिसणार आहे.