रिझर्व्ह बँकेने दिली तीन महिने निर्बंध मुदतवाढ

नगर अर्बन संचालकांना तीन महिने जीवदान
रिझर्व्ह बँकेने दिली तीन महिने निर्बंध मुदतवाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेच्या सत्ताधारी संचालकांना रिझर्व्ह बँकेने मंगळवारी दिलासा दिला. या बँकेवरील निर्बंधांना 9 महिने झाले, असले तरी आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे.

नगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक मंडळ 1 डिसेंबर 2021 रोजी सत्तारुढ झाल्यावर लगेच 6 डिसेंबरला रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या कामकाजावर निर्बंध लावले. त्यानुसार नव्या ठेवी स्वीकारणे व नवे कर्ज वाटप करणे, कर्ज जुने-नवे करण्यासह अन्य कामकाजाला मनाई करण्यात आली. त्यामुळे संचालक मंडळाला फक्त कर्ज वसुलीचेच काम राहिले. सुरुवातीच्या सहा महिन्यांचे निर्बंध 6 जूनला संपल्यावर त्यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली व ती मुदत मंगळवारी 6 सप्टेंबरला संपणार असल्याने या बँकेबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याची उत्सुकता होती.

मात्र, निर्बंध मुदतीत आणखी 3 महिन्यांची वाढ करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे पत्र बँकेला मिळाले आहे. यानुसार आता 6 डिसेंबरपर्यंत बँक कामकाजावरील निर्बंध कायम राहणार आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयास रिझर्व्ह बँकेचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी यांनी दिली. बँकेच्या कारभारास 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यादरम्यान बँकेवरील निर्बंधांमध्ये काहीही बदल केलेला नाही. सत्ताधारी संचालक मंडळाने मागील नऊ महिन्यांत 15 हजारांवर थकबाकीदारांकडून 187 कोटी रुपये कर्ज वसूल केले आहेत तसेच नुकतीच बँकेस एक रकमी कर्जफेड योजनेस मंजुरी मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

भपारी मारणारे पळून गेले

नगर अर्बन बँकेवरील निर्बंधांना तीन महिन्यांची मुदतवाढ ही बँकेच्या पाच लाखांपुढील ठेवीदार व खातेदारांसाठी खूपच निराशाजनक बातमी आहे, अशी प्रतिक्रिया नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी व्यक्त केली. बँकेवरील निर्बंध उठविण्यात संचालक मंडळाला अपयश आले असून, हे संचालक सत्तेत आले आणि ठेवीदारांचे तब्बल 350 कोटी रुपये अडकून पडले असून, त्याला आता एक वर्ष पूर्ण होईल. पण, दोन दिवसात निर्बंध उठवून आणतो अशी भपारी मारणारे राजीनामा देवून पळून गेले, असे भाष्यही त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com