पालिका सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत

पालिका सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत

जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली, पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड नगर परिषद तर नेवासा नगर पंचायतीचा समावेश || हरकती-सुचनांसाठी 21 जूनपर्यंत मुदत

मुंबई, अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यभरातील 216 नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दिली.यात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड या 9 नगर परिषदा तर नेवाशाच्या नगर पंचायतीचा समावेश आहे.

आरक्षणाची सोडत काढण्यात येणार्‍या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल.

आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी आज 10 जून रोजी नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

आरक्षणाबाबत उत्सुकता इच्छुकांच्या नजरा

आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. तर आपल्या प्रभागात महिला आरक्षण पडल्यास अनेकांनी आपल्या घरातील आई, पत्नीला उभे करण्याचे नियोजन केले आहे. तर अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षण पडल्यास शेजारच्या प्रभागात घुसखोरी करण्याची तयारी केली आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर खर्‍या अर्थाने राजकीय घडामोडींना कमालीचा वेग येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com