आरक्षण सोडतीत दत्तनगर गट व गणामंध्ये आंबेडकरी जनतेवर अन्याय - विघे

आरक्षण सोडतीत दत्तनगर गट व गणामंध्ये आंबेडकरी जनतेवर अन्याय - विघे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दत्तनगर गट व गणामंध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या जास्त असूनही गेल्या 20 ते 25 वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणामंध्ये अनुसूचित जाती मागासवर्गीय समाजावर गट व गणातील आरक्षण सोडतीमध्ये अन्याय झाला आहे. या निर्णयावर लवकरच जनआंदोलन करण्याचा इशारा दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब विघे यांनी दिला आहे.

विघे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दत्तनगर गट व गणात आंबेडकरी समाजामध्ये सुशिक्षित, शिकलेले अनेक लोक आहेत. अहमदनगर जिल्ह्याला ज्यांनी आंबेडकरी चळवळ ज्वलंत ठेवली व खर्‍या अर्थाने आंबेडकरी समाजाला न्याय व अधिकार देणारे या परिसरात प्रतिनिधी आहे. परंतु जिल्ह्यातील मातब्बर व प्रस्थापितांनी श्रीरामपूर तालुक्यातील आंबेडकरी जनतेला जिल्ह्याच्या राजकारणापासून सोयीस्कररित्या बाजूला केले आहे. डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीचा गळा दाबण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न केला आहे. खर्‍या अर्थाने 2009 ला श्रीरामपूर तालुका ज्या मागासवर्गीयांच्या आधारावर आरक्षित म्हणून जाहीर केला, त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका विशिष्ट समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न प्रस्थापितांनी आतापर्यंत केला आहे. तोही एक आंबेडकरी जनतेवर अन्याय आहे. आंबेडकरी चळवळीतील लोकांनी फक्त यांना मते देण्यासाठी जन्म झाला आहे का? असा प्रश्न विघे यांनी उपस्थित केला आहे.

दत्तनगर गटामध्ये खंडाळा, उक्कलगाव, एकलहरे, भैरवनाथनगर, टिळकनगर या परिसरात मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे, तरी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेला आरक्षणाचा निर्णय चुकीचा व राजकीय दबावाखाली घेतला असून त्यामध्ये जातीनिहाय जनगणना या धोरणानुसार घेतलेला नाही, हे स्पष्ट दिसत आहे. या निर्णयाविरोधात दत्तनगर गट व गणातील सर्व आंबेडकरी विचारांच्या लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. कानडे यांनी सुद्धा श्रीरामपूर तालुक्याचा गट व गणातील राजकीय आरक्षण सोडतीवर दुर्लक्ष केले असल्याने या निर्णयाविरुद्ध लवकरच जनआंदोलन करण्यात असल्याचे विघे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com