रिपाइंचा राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा

शिवसेनेच्या आमदारांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
रिपाइंचा राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा

राहुरी (प्रतिनिधी) / Rahuri - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य केल्याने या आमदारावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, राहुरी तालुक्यातील खडांबे येथील अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब लटके यास तात्काळ अटक करावी, राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील दलित युवक रवींद्र लोंढे याच्यावर काही गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करावी, आदी मागणीसाठी राहुरी तहसीलवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (Republican Party of India's (Athawale)) च्या वतीने उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

खामगाव तालुक्यातील दलित अत्याचार प्रकरणी चितोडा गावातील रमेश हिरवाळे या दलित तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना अत्यंत गंभीर असून देखील तेथील शिवसेनेचे आ. गायकवाड यांनी या गावात जाऊन चिथावणीखोर वक्तव्य करत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. आमदारांवर कारवाई करा, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर देखील भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.

यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन डिवायएसपी संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, विजय वाकचौरे, श्रावण वाघमारे, सिमा बोरूडे, स्नेहल सगळगिळे, रमेश गायकवाड, गोविंद दिवे, सचिन साळवे, दत्तात्रय भोसले आदींसह भीमसैनिक उपस्थित होते.

आ. गायकवाड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा रिपाइं आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन हाती घेईल. जोपर्यंत आ. गायकवाड यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत रिपाइं कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी दिला आहे.

खर्‍याला खरे म्हणा...

राहुरी तालुक्यातील खडांबे येथील आरोपींना देखील तात्काळ अटक करावी, अशी मागणी आरपीआयच्यावतीने या मोर्चात करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाला त्यांनी देखील पाठिंबा देऊन याठिकाणी येणे गरजेचे होते. मात्र, खर्‍याला खरं म्हणा, असे आवाहन सुरेंद्र थोरात यांनी संबंधितांना केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com