नगर-पुणे थेट रेल्वे सेवेचा 15 दिवसांत अहवाल

खा. डॉ. विखे यांची माहिती: दौंड- नगर प्रवास करून घेतला आढावा
नगर-पुणे थेट रेल्वे सेवेचा 15 दिवसांत अहवाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील युवक, नागरिकांसह व्यावसायिक यांना नगर-पुणे प्रवास स्वस्त व कमी वेळेत करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. यासाठी येत्या 15 दिवसांत या मार्गाबाबतचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली.

खा. डॉ. विखे यांनी सोमवारी दौंड ते नगर रेल्वे प्रवास करून रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली. नगर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, धनंजय जाधव, राहुल कांबळे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वाधवा, अशोक कानडे, अमित गटणे, सुरज कुरलीये, नगर रेल्वे स्थानक व्यवस्थापक एन. पी. तोमर, आर. एस. मीना आदी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले, नगर-पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील व जिल्ह्यातील युवक, नागरिक दररोज प्रवास करू शकतात. यासाठी दैनिक व मासिक पास सुरू करणार आहे. नगरमधून पुणे येथे जाण्यासाठी अवघ्या दोन तासाचा कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने दौंड येथे 30 कोटी रूपये खर्च करून कोल्ड लाईन स्टेशन उभारले आहे. ही रेल्वे सुविधा सुरू झाल्यानंतर नगरकरांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, याच बरोबर सुखकर प्रवास होऊन नागरिकांची आर्थिक बचत होईल, असे ते म्हणाले. यासाठी नगर आणि दौंड या ठिकाणी बैठका घेवून डीपीआर तयार करण्याच्या सुचना संबंधीतांना दिल्या आल्याचे खा. विखे यांनी सांगितले. यामुळे लवकरच नगर-पुणे रेल्वे सेवा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.