गोदावरी कालव्यांची दुरूस्ती : 10 कोटी 57 लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता

कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आणि शिर्डीसह अनेक ग्रामपंचायती, साखर कारखान्यांना दिलासा
गोदावरी कालव्यांची दुरूस्ती : 10 कोटी 57 लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता
File Photo

अहमदनगर | बद्रीनारायण वढणे| Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हजारो एकर शेती तसेच शिर्डीसह अनेक ग्रामपंचायत, साखर कारखाने आणि औद्योगिक क्षेत्राच्या पाण्याचे भवितव्य असलेल्या गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्यांच्या नुतनीकरणाच्या पार्श्वभूमीवर विशेष दुरूस्ती अंतर्गत विविध बांधकामांसाठी 10 कोटी 56 लाख 97 हजार 567 रूपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास काही अटी व शर्तींवर जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे या कालव्यांच्या दुरूस्तीच्या कामास आणखी वेग मिळणार आहे.

ब्रिटिशकालीन गोदावरी कालव्याचे आयुर्मान 100 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे ते अनेक ठिकाणी दरवर्षी पाण्याच्या आवर्तनात फुटत असतात. त्यातून हजारो क्युसेक पाण्याची नासाडी होत असते. वर्षांनुवर्षे हे कालवे दुरुस्त करावे म्हणून माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, माजी आ. अशोक काळे व आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे आदींनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यातून यापूर्वी कालव्यांच्या दुरूस्तीस निधी मिळाला आहे. आताही10 कोटी 56 लाख 97 हजार 567 रूपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे दुरूस्तीच्या कामास वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उजवा कालवा नुतनीकरण अंतर्गत सा.क्र.4420, सां.क्र.4620, व सा.क्र.5630 मी आरसीसी पाईपयुक्त मोरीच्या बांधकामास विशेष दुरूस्तीच्या कामाच्या 4 कोटी 36 लाख 22 हजार 852 रूपये तसेच सा.क्र.7040 व सा.क्र.7820 मी आरसीसी पाईपयुक्त मोरीच्या विशेष दुरूस्तीच्या बांधकामास 2 कोटी 89 लाख 41 हजार 467 रूपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कालव्यातील गाळ काढणे, कालवा भराव, व गवत, झाडे काढण्याची कामे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी संघटनेकडे उपलब्ध मशिनरीद्वारे करण्यात येणार आहे.

गोदावरी डावा कालवा नुतनीअंतर्गत सा.क्र.. 15680 व 16450 मी आसीसी पाईपयुक्त मोरीच्या बांधकामास विशेष दुरूस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत विस्तार व सुधारणा अंतर्गत 3 कोटी 31 लाख 33 हजार 248 रूपये किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय अटींवर मान्यता देण्यात आली आहे. कालव्यातील गाळ काढणे, कालवा भराव, व गवत झाडे काढण्याची कामे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी संघटनेकडे उपलब्ध मशिनरीद्वारे करण्यात येणार आहे. ही कामे तातडीने झाल्यास अपव्यय टळणार असून शेतकर्‍यांना अधिक पाणी मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com