मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू कराः आ.आशुतोष काळेंचे ना. भुजबळांना साकडे

मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू कराः आ.आशुतोष काळेंचे ना. भुजबळांना साकडे

कोपरगाव (प्रतिनिधी) -

शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी

करण्याचा निर्णय घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरू केले होते, मात्र सर्व मका उत्पादक शेतकर्‍यांची मका खरेदी करण्यापूर्वीच ही मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार असून ही मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करावीत, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रीछगनराव भुजबळ यांना घातले आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांची भेट घेऊन कोपरगाव मतदारसंघात सुरू करण्यात आलेले शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे याबाबत निवेदन दिले. चालू हंगामात समाधानकारक पर्जन्यमानामुळे सर्वच पिकांबरोबरच मका पिकाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर मका पिकाचे उत्पन्न वाढल्यामुळे दुसरीकडे मकाचे बाजारभाव पडले होते. अशावेळी चिंतेत सापडलेल्या मका उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना मकाचे योग्य दर मिळत होते. मात्र शासनाकडून 16 डिसेंबर रोजी अचानक ही मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. मात्र आजही अनेक शेतकर्‍यांची मका विक्री करणे अद्याप बाकी असून मका खरेदी केंद्र बंद केल्यामुळे मका उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यासाठी बंद करण्यात आलेली मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करावीत. तसेच दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेल्या मकाची लॉट एन्ट्री व्हावी. मका खरेदीचे शासन पोर्टल बंद झाल्याने 7 शेतकर्‍यांची 3 लाख 35 हजार 775 रुपये खरेदीची लॉट एन्ट्री झालेली नसून सदर एन्ट्री करण्यात यावी, अशी मागणी ना. छगनराव भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com