अहमदनगर : ‘रेमडेसिवीर’ चा खडखडाट

करोना रुग्ण अत्यावस्थ तर नातेवाईकांची फरफट
अहमदनगर : ‘रेमडेसिवीर’ चा खडखडाट
रेमडेसिवीर

हॉस्पिटलला इंजेक्शन पुरवठ्याची घोषणा हवेतच

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यात अत्यावस्थ करोना रुग्णांना आता रेमडेसिवीर हे इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये मिळणार असल्याची जिल्हा प्रशासनाची घोषणा हवेतच विरली आहे. गुरूवारी जिल्हाभरातून रेमडेसिवीरची मागणी असताना ते उपलब्ध न झाल्याने अखेर रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी त्राहिमा्म म्हणण्याची वेळ आली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोनाचा संसर्ग वाढत असून अत्यावस्थ रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 15 पेक्षा अधिक एचआरसीटी स्कोअर असणार्‍या आणि ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांना हे इंजेक्शन आवश्यक असतानाही त्यांचा पुरवठा ना बाजारात ना हॉस्पिटलला होत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची त्यासाठी फरफट सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने बुधवारी त्यांच्या निगराणीत अन्न-औषध प्रशासन विभाग गरज असणार्‍या हॉस्पिटला या इंजेक्शनचा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात दुसर्‍या दिवशी म्हणजे काल हे इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल झाले. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतरही करोना रुग्णालय चालविणार्‍या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अत्यावस्थ रुग्णांच्या हाती रेमडेसिवीर इंजेक्शनची चिठ्ठी देवून त्यांना हे इंजेक्शन उपलब्ध करण्यास सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील या इंजेक्शनच्या साठ्याबाबत रात्री उशीरापर्यंत जिल्हा प्रशासन अथवा अन्न-औषध प्रशासन माहिती देवू शकले नाही. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com