ऑक्सिजन आले, पण रेमडेसिवीरचा ताळमेळा लागेना!

ऑक्सिजन आले, पण रेमडेसिवीरचा ताळमेळा लागेना!

लालफितीच्या चक्रात अकडली मागणी अन् पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या दोन-तिन दिवसात करोना संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात घटलेले दिसत आहे. मागणीच्या तुलनेत मंगळवारी ऑक्सिजनचाही पुरवठा बर्‍यापैकी झाला. मात्र, सर्वत्र चर्चेचा आणि मागणीचा विषय असणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनचा ताळमेळ लागतांना दिसत नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे प्राण आता रुग्णांसोबत कंठाला आले आहेत. तर दुसरीकडे लालफितीच्या चक्रात मागणी आणि पुरवठा अडकल्याने, ‘कोणी रेमडेसिवीर देता का’ असा टाहो फोडण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी 50 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला. जिल्ह्याची मागणी दररोज 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची असताना काल बर्‍यापैकी ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. त्याआधी दोन दिवस मागणीच्या तुलनेत निम्मा अथवा 60 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. मात्र, दुसरीकडे करोना अत्यावस्थ रुग्णावर उपचार करण्यासाठी मागणी असणार्‍या रेमडेसिवीरच्या बाबतीत कोणीच अचूक माहिती देताना दिसत नाही.

जिल्हास्तरावर रेमडेसिवीरच्या नियोजनासाठी उपजिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या इंजेक्शनची गरज असणार्‍या रुग्णांना ते दाखल असणार्‍या हॉस्पिटलमार्फत जिल्हा प्रशासनाला इंजेक्शन मागणीचा मेल पाठवायचा. येणार्‍या मेल (मागणी) नुसार प्रशासन जिल्हा रुग्णालयात खात्री झाल्यावर अत्यावस्थ रुग्णांसाठी प्रातांधिकार्‍यां मार्फत संबंधीत तालुक्यातील रुग्णालयनिहाय यादी तयार करून त्यानुसार इंजेक्शनचे वाटप करण्यात येत आहे.

यातही हे इंजेक्शन संबंधीत हॉस्पिटलचे मेडिकल असल्यास त्याठिकाणी अथवा जवळच्या मेडिकल मार्फत ते आधी हॉस्पिटल आणि त्यानंतर रुग्णांपर्यंत पोहत आहे. यासाठी जिल्हास्तरानंतर संबंधीत विभागाचे प्रातांधिकारी यांनी पुरवठा निश्चित करून इंजेक्शनची ऑर्डर काढत आहे. यासर्व कसरतीमध्ये अत्यावस्थ रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळेल की नाही, याची खात्री कोणी देऊ शकत नाही. यामुळे सरकारच्या लालफितीच्या कारभाराचा असाही करोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केल्यावर कोणत्याही प्रकाराची माहिती दिली जात नसल्याचे चित्र आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com