रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या कोल्हारचा तरूण अटकेत

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या कोल्हारचा तरूण अटकेत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर या इंजेक्शन औषधाचा काळाबाजार करणार्‍या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारसायकल व मोबाईल असा 1 लाख 10 हजाराचा ऐवज तसेच त्यांच्या बॅगेत असलेली 26 हजार 800 रुपये रोख रक्कम जप्त केली होती. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरु केले होते. मात्र गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे सांगिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

काल सकाळी रेल्वे कॉलनीतील एका युवतीच्या वडिलांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तिला जास्त किंमतीने दोघेजण औषध देणार असल्याची माहिती संजय रुपटक्के यांंना मिळाली. त्यांनी त्यांचे मित्र गणेश जायगुडे, सोमनाथ कदम यांंना घेऊन तिला इंजेक्शन घेण्यासाठी पैसे नेवून दिले व तेथेच थांबून सोमनाथ कदम याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल नरवडे यांना फोन करुन या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर तेथे पोलीस नरवडे व त्यांचे सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी हे तेथे आले त्यांनी पाळत ठेवून या दोघांंना साखर कामगार हॉस्पिटलच्या भिंतीजवळ बाहेरील बाजुस मोटारसायकलवरुन येतांना पाहिले. त्यावेळी त्यांनी त्या तरुणीला 4 हजार 800 रुपये किंमतीचे इंजेक्शन औषध 20 हजार रुपये किंमतीस विकत असताना पकडले. त्यातील एक़ास चाहूल लागताच एकजण पसार झाला होता.

मात्र त्यालाही पकडण्यात यश आले. पकडलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम श्रीराम जाधव, रा. कोल्हार ता. राहाता असे असल्याचे सांगुन पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्यानेे त्याचे नाव प्रवीण प्रदीप खुने, रा. भातंबरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापुर असे असल्याचे सांगुन येथील एका डॉक्टरकडे वॉर्ड बॉय म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तसेच त्यानेच मला रेमडेसीवीर इंजेक्शन विक्रीसाठी आणून दिले असे सांगितले.

त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी दोन पंचांना बोलावून घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात असलेले 4 हजार 800 रुपये किमतीचे पांढर्‍या रंगाचे बॉक्समध्ये रेमडेसिवीेर इंजेक्शन त्यामध्ये पांढर्‍या रंगाची पावडर असलेली काचेची बाटली, 50 हजार रुपये किमतीची एमएच 23 एएम 0933 या क्रमांकाची काळ्या रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटार सायकल, 60 हजार रुपये किंमतीचा वन प्लस एट प्रो कंपनीचा मोबाईल, 26.800 रुपये रोख रक्कम त्यामध्ये 200 व 50.रुपये दराच्या चलनी नोटा अशा वस्तु मिळून आल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 215/2021 प्रमाणे शुभम श्रीराम जाधव, प्रवीण प्रदीप खुने या दोघांविरुध्द भादंवि कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com