सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तिघांना अटक
सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

सोशल मिडीयावर एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शहर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर उशिरा 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना अटक करावी, अशी आग्रही मागणी एका समाजाने केल्याने शहरांमध्ये तणावसदृश्य वातावरण आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी संगमनेरात दाखल झाले असून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

अंतोनिया मोईनो या व्यक्तीने पश्चिम बंगाल येथील एक लग्नासंबंधीची बातमी सोशलमिडीयावर पोष्ट करुन ती व्हायरल केली. यामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे शब्दप्रयोग करण्यात आले होते. ही पोष्ट संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरातील नायकवाडपुरा येथे राहणार्‍या व एका धार्मीक स्थळामध्ये काम करणार्‍या मौसिन सनमान खान यांनी आपले सोशल अकाउंटवर पाहिली. त्याने समाजातील इतर युवकांना याबाबत माहिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या समाजातील युवक शहरातील दिल्ली नाका परिसरात मोठ्या संख्येने शुक्रवारी रात्री 10 वाजेनंतर एकत्र आले. त्यानंतर तब्बल दोन हजार लोकांचा जमाव शहर पोलीस ठाण्यात जमा झाला. सोशल मिडीयावर ज्यांनी धार्मिक भावना दुखावतील अशा पोष्ट केल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह या जमावाने धरला.

संतप्त जमाव पोलिस ठाण्यात आल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पोलिस ठाण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी जमावातील काही युवकांनी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या मोटरसायकलचे मोठे नुकसान केले. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या झाडांच्या कुंड्या ही त्यांनी तोडून टाकल्या. यावेळी काही युवक संगमनेर बस स्थानकाच्या परिसरात थांबलेले होते. खाजगी वाहनांना जमावाने अडविले होते. त्यानंतर पोलिस अधिकार्‍यांनी आश्वासन दिल्याने संतप्त जमाव माघारी गेला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे या संगमनेरात त्वरीत दाखल झाल्या. पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरीत तपास सुरू करून आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके रवाना केली.

सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मौसिन सनमान खान याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अंतोनिया मोईनो, विनय राठोर, दादा पवार, आदी गोस्वामी, विद्रोही जनक हेपतुल्ला, महाबली दुर्मुख, अर्जुन देशखुम, पियुष-पियुष, सुनिता गायकवाड, पोलिटिकल बोका, द ट्रोलर, ऋषी ठाकरे, शशिकांत कनाशेट्टी, एजेएवाय, आऊल बाबा, बालकी अनिल, विकी गौरव, विनय राठोर, अजय वर्मा, योगेश देशमुख, धर्मविर भारद्वाज, हरिष पाटील, जितेंद्र पाटील, गणेश दान्डडे, डॉ. कप्तान जॅक, श्रीनिवास मुंडे, जयदेव सिंग धुदानी, अमित भोंडवे, पार्थ डी.हिंदु, मच्छिंद्र देवकाते, श्रेयश चंदनशिव, दिपक शरद चन्ने, दशरथ गाडे, राजु भाझ्या या 34 जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153, 295 अ, 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी अमित भोंडवे (वय 25, राहणार सोनई), ऋषिकेश ठाकरे (वय 21, राहणार माळेगाव हवेली, तालुका संगमनेर), शुभम राजहंस आगे (वय 22, राहणार भिस्तबाग चौक अहमदनगर) यांना अटक केली आहे.

पोलिसांचा ढिसाळपणा

शहरातील दिल्ली नाका परिसरात रात्री उशिरा दोन हजार युवकांचा जमाव एकत्र आला. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन परिस्थिती हाताळली नाही, यामुळे हा जमाव थेट पोलीस ठाण्यात आला. यावेळी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पोलिसांंची संख्या अतिशय अपुरी होती. घोषणा देत जमावातील काही युवकांनी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या वाहनांची तोडफोड केली. शहरातील तीनबत्ती चौक परिसरात हा जमाव जमा झाल्यानंतर समाजातील काही नेत्यांनी पोलीस निरीक्षकांना फोन करून बोलावले होते. मात्र पोलिस अधिकार्‍यांनी या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ केली. जमावाला माघारी पाठवून द्या, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यानंतर हा जमाव पोलिस ठाण्यावर चाल करून आला. अधिकारी जमावाला सामोरे गेले असते तर पुढील घटना टळली असती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com