बनावट डिझेल प्रकरणातील पोलीस कर्मचार्‍यांची निलंबनातून मुक्तता

बनावट डिझेल प्रकरणातील पोलीस कर्मचार्‍यांची निलंबनातून मुक्तता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट डिझेल प्रकरणात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यास विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकातील एका अधिकार्‍यांसह सात कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते. त्या कर्मचार्‍यांची निलंबनातून मुक्तता करण्यात आली असून त्यांना विविध पोलीस ठाण्यात नेमले आहे. तसेच इतर कारणातून निलंबित तीन कर्मचार्‍यांची देखील निलंबनातून मुक्तता करण्यात आली आहे.

तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक राठोड यांच्या विशेष पथकाने 26 ऑक्टोबर 2020 रोजी भिंगार पोलीस स्टेशन हद्दीतील जीपीओ चौकात बनावट डिझेल साठ्यावर छापा टाकला होता. याप्रकरणात काही आरोपींना अटक देखील झाली. त्यावेळी दुपारी झालेल्या कारवाईचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल न झाल्याने अपर पोलीस अधीक्षक राठोड यांच्यासह कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते.

बनावट डिझेल प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना दिले होते. मदने यांनी पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर केल्यानंतर राठोड यांच्या पथकातील एका अधिकार्‍यासह सात पोलिसांचे निलंबन केले होते. बनावट डिझेल प्रकरणात गुन्हा दाखल करताना विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न करण्यात येऊन कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, हवालदार भरत डोंगरे, हवालदार गणेश डहाळे, राजाराम शेंडगे, नाईक अरविंद भिंगारदिवे, अजित घुले, संदीप धामणे, विनोद पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यांची निलंबनातून मुक्तता करतानाच वेगवेगळ्या कारणांमुळे निलंबित झालेले पोलीस मुख्यालयातील राजू चव्हाण, शंकर रोकडे व अकोले पोलिस ठाण्यातील प्रविण अंधारे यांच्यावरील कारवाई मागे घेत त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com