कत्तलखान्यात चालविलेल्या आठ गाईंची सुटका

राहुरी फॅक्टरीवरील घटना ; राहाता तालुक्यातील दोन जणांवर गुन्हा
कत्तलखान्यात चालविलेल्या आठ गाईंची सुटका

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दि. 29 मे रोजी राहुरी पोलिसांनी कारवाई करत कत्तलखान्यात चालविलेल्या आठ गाईंची सुटका केली. याप्रकरणी राहाता तालुक्यातील दोन आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मागील आठवड्यात राहुरी शहरात 150 किलो गोमांस नेणारे वाहन पकडण्यात आले होते. आता ही दुसरी घटना घडल्याने तालुक्यात गोवंश हत्याबंदी कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.

आरोपी मोहम्मद नूर कालू शेख (वय 30 वर्षे) व अमजद फकीर मोहम्मद शेख (वय 30, दोघे रा. ममदापूर, तालुका राहाता) हे दि. 29 मे रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान त्यांच्या ताब्यातील एक महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी नंबर एमएच 12 जीटी 2230 मध्ये आठ जनावरांना क्रूर व निर्दयपणे पिकअप गाडीत कोंबून वाहतूक करीत होते. राहुरी पोलिसांना खबर मिळताच त्यांनी राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर येथे ही पिकअप गाडी व दोन आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी पिकअप गाडीमधील आठ जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले.

या कारवाई दरम्यान 5 हजार रुपये किमतीची पांढर्‍या रंगाची गावरान जातीची एक गाय, 15 हजार रुपये किमतीचे चार लहान-मोठे गावरान जातीच्या कालवडी, 30 हजार रुपये किमतीच्या तीन काळ्या पांढर्‍या रंगाच्या जर्सी गाई तसेच 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची सफेद रंगाची एक महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी नंबर एमएच 12 जीटी 2230 असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

हवालदार सचिन ताजणे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद नूर कालू शेख व अमजद फकीर मोहम्मद शेख या दोघांवर गुन्हा रजि. नं. व कलम - । 431/2021 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विठ्ठल राठोड हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.