मागण्या मान्य करा अन्यथा शेतकर्‍यांचा एल्गार मंत्रालयावर- आ. विखे
सार्वमत

मागण्या मान्य करा अन्यथा शेतकर्‍यांचा एल्गार मंत्रालयावर- आ. विखे

Nilesh Jadhav

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, तुम्ही जनतेच्या मनातून केव्हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकर्‍यांचा एल्गार मंत्रालयावर येवून धडकेल, असा इशारा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आ.विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका करून सरकार मधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

नगर मनमाड रस्त्यावर घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले. दूध उत्पादकांच्यावतीने मागण्यांचे निवेदन आ.विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले.

या आंदोलनात गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, तालुका दूध संघाचे चेअरमन रावसाहेब देशमुख, चेअरमन नंदु राठी, सभापती बापूसाहेब आहेर, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, जेष्ठनेते शरद थोरात, अ‍ॅड.रघुनाथ बोठे, भाजपाचे शहर अध्यक्ष अनिल बोठे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, दिपक रोहोम, वाल्मिकराव गोर्डे, बाबासाहेब डांगे, डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

10 रुपये तोटा सहन करून शेतकरी दूधधंदा करीत आहेत. शेतकर्‍यांना आघाडी सरकारने 25 रूपये हमीभाव जाहीर केला. पण राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघानी शेतकर्‍यांचे दूध 18 ते 19 रुपयांनी खरेदी करून दूध उत्पादकांची फसवणूक केली आहे. सरकार दूध भुकटीसाठी अनुदान देत असतानाही शेतकर्‍यांना मिळत नाही मग या अनुदानाचे गौडबंगाल काय आहे? दूध अनुदानाचा या महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे आ.विखे पाटील यांनी आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी करोनाच्या काळातही महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहीले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी राजेंद्र पिपाडा, शरद थोरात यांची भाषणे झाली.

आ. राधाकृष्ण विखेंच्या नेतृत्वाखाली लोणीत दूध आंदोलन

लोणी|वार्ताहर|Loni

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

पद्मश्री चौकात हे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात दूध उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

आंदोलनात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, सुभाष विखे, किसनराव विखे, संपतराव विखे, मुरलीधर विखे, रामभाऊ विखे, नाना म्हस्के, वसंतराव विखे, जेष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के, अशोक धावणे, बाळासाहेब वाबळे, भाऊसाहेब विखे, नवनीत साबळे, सचिन विखे, प्रा.भाऊसाहेब विखे, अनिल विखे, विकास म्हस्के, काशिनाथ म्हस्के, संतोष विखे, अनिल विखे, संजय म्हस्के आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com