शनिवार, रविवारचे निर्बंध हटवा

नगरच्या व्यापारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शनिवार, रविवारचे निर्बंध हटवा

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - राज्यात करोनाच्या (coronavirus) डेल्टा व डेल्टा प्लसचा नवीन विषाणू आढळून आल्याने सरकारने शनिवार व रविवारी कडक निर्बंध लावले आहेत. हे शनिवार, रविवारचे निर्बंध हटविण्यात यावेत. तसेच राज्यातील दुकानांच्या वेळांमध्ये बदल करण्याची मागणी नगरमधील विविध व्यापारी संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना (Chief Minister Uddhav Thackeray) पाठविण्यात आले आहे.

राज्यात नव्याने घातक विषाणू आढळून आल्याने सरकारने राज्यात निर्बंध घातले आहेत. दुकानदारांना सकाळी सात ते संध्याकाळी चारची वेळ देण्यात आली आहे. परंतु दुकानदारांसाठी आणि व्यावसायिकांसाठी ही वेळ गैरसोयीची आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 किंवा सकाळी 10 ते 7 पर्यंत ही वेळ करण्यात यावी. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊनमध्ये नागरिक घरात न राहता हिल स्टेशन आणि पिकनिक स्पॉट्स गर्दी करतात. त्यामुळे शनिवार व रविवार लॉकडाउनचा उपयोग होत नाही. जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागांच्या तुलनेत शहर भागात रुग्ण संख्या कमी आहे.

म्हणून, लोकसंख्येची कोणतीही अट न घालता उर्वरित जिल्ह्यापासून शहर भाग स्वतंत्र करावा. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लॉकडाऊन शिथील करावे, अशा विविध मागण्यांचा विचार करून दुकानांना सकाळी 9 ते संध्याकाळी 6 किंवा सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी व शनिवार, रविवारचा लॉकडाउन रद्द करावा अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव देडगावकर, सेक्रेटरी किरण व्होरा, सराफ सुवर्णकार संघटनेचे सुभाष मुथा, सराफ सुवर्णकार संघटनेचे निलकंठराव देशमुख, अखिल भारतीय लाड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार यांना देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com