तारकपूरच्या हॉस्पिटलमध्ये राडा

करोनाग्रस्ताच्या मृत्युनंतर डॉक्टरला मारले
तारकपूरच्या हॉस्पिटलमध्ये राडा

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाबाधित पेशंटची डेथ झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाण केली. तारकपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये काल मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज तानाजी गडाख आणि रोहन बाबासाहेब पवार (दोघेही रा. टाकळी काझी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दोन आयसीयू असून तेथे 20 बाधितांवर उपचार सुरू आहेत. तानाजी नारायण गडाख (वय 72) हे 8 मे रोजी कोरोना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट झाले. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर आयसीयुत उपचार सुरू होते.

ऑक्सिजन मास्क स्वत:च्या हाताने ते काढत असल्याने त्यांच्याजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी दिलेली होती. आयसीयुत इतर पेशंट तपासत असताना तानाजी गडाख यांनी ऑक्सिजन मास्क काढून टाकला. ब्रदर प्रवीण गायकर यांनी तो परत लावला. मात्र दरम्यानच्या काळात ते बेशुध्द झाले. पेशंटची तब्येत बिघडल्याचे नातेवाईकांना लेखी व तोंडी कळविले. साडेबारा वाजेच्या सुमारास तानाजी गडाख यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर मुलगा पंकज, रोहन हे हॉस्पिटलमध्ये आले. तेथे त्यांनी डॉक्टर ठोकळ व इतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. ओपीडीत डॉ. ठोकळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘उद्या सकाळी तुला बघून घेतो, तुला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत हॉस्पिटलच्या ओपीडीतील टेलीफोन, व्हीवो मशीन, कर्टनची तोडफोड केली. ब्रदर प्रवीण गायकर यांनाही आरोपींनी मारहाण केली. हॉस्पिटल प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस तेथे पोहचले.

कोवीड पेशंटचा मृत्यू झाल्याच्या रागातून पंकज गडाख आणि रोहन पवार या दोघांनी मारहाण करत हॉस्पिटलची तोडफोड केली, शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघाविरोधात हॉस्पिटलच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी वैद्यकीय कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नगर शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये कोवीड बाधितांचा मृत्यू होतो. मात्र कुठेही अशी घटना घडली नाही. नगर शहरात प्रथमच नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे आता करोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टरह सुरक्षित नसल्याचे समोर आले. बाधितांजवळ नातेवाईकास थांबण्यास मनाई आहे. मात्र माणुसकी नात्याने डॉक्टरांनी गडाख यांच्याजवळ त्यांच्या मुलास थांबण्याची परवानगी दिली होती. त्यातून अशी घटना समोर आल्याने आता गंभीर पेशंटजवळ नातेवाईकांना थांबण्याची परवानगी डॉक्टर देणार नाहीत, अशी चर्चा आहे.

आयसीयूतून ओढत आणले

पंकज आणि रोहन या दोघांनी डॉ. ठोकळ यांना ओपीडीत मारहाण केली. त्यानंतर डॉक्टर ठोकळ दुसरे पेशंट तपासणीला आयसीयुत गेले. रोहन पवार याने आयसीयुतून डॉ. ठोकळ यांची कॉलर पकडून ओढत पुन्हा ओपीडीत आणले. तेथे परत डॉक्टरांना मारहाण केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com