अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, तसेच विशेष

सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्या मयत जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी सरकारकडे केल्या आहेत. रूणाल जरे यांनी त्यांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांच्यामार्फत पोलीस अधीक्षकांकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. या निवदेनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

रुणाल जरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार बाळ बोठे अजूनही फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे चौकशी रेंगाळल्याने संशयाला वाव फुटला आहे. बोठे याचा पूर्वीचा इतिहास पाहिला असता तो थक्क करणारा आहे. त्याच्या इतिहासाचे दाखले आता गुन्ह्याच्या स्वरूपात लोकांसमोर येत आहेत.

बोठे याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स मुख्य पुरावा ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये खून खटल्याची लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी, मूळ फिर्यादींना लवकरात लवकर न्याय मिळून या खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिल अॅड.उज्ज्वल निकम किंवा उमेशचंद्र यादव यांची नेमणूक होणे आवश्यक व गरजेचे आहे. सदर खटला जलतगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर न्याय निवाडा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.