अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या घराची व तो काम करत असलेल्या कार्यालयाची पोलिसांनी शनिवारी झडती घेतली.

घर झडती दरम्यान काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान, मयत जरे यांच्या घरी पोलिसांनी झडती घेतली. त्याठिकाणी काही पुरावे हाती लागले का? असे विचारले असता याबाबत अधीक्षक पाटील यांनी मौन बाळगले.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी जातेगाव घाटामध्ये हत्या झाली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. यातील दोघे पोलीस कोठडीत तर तिघे न्यायालयीन कोठडीत आहे. या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठे हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. आरोपी बोठे पसार झाला असला तरी पोलिसांनी त्याच्या बालिकाश्रम रोडवरील घराची वेळोवेळी झडती घेतली आहे.

यापूर्वीच्या झडतीमध्ये त्याच्या घरातून महत्वाचे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केलेली आहेत. शनिवारी तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बोठे याच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहे. परंतू, याबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, बोठे हा एका दैनिकाचा संपादक म्हणून काम करत होता. त्या दैनिकाच्या नगर कार्यालयात पोलिसांनी शनिवारी झडती घेतली आहे. त्याठिकाणीही काही माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

बोठेची माहिती द्या

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याचा शोध करून तो पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे अखेर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना साद घातली आहे. बोठे याच्याबाबत काही माहिती असल्यास ती आम्हाला द्या, त्यांची गोपनियता ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. फरार बोठेचा पोलीस कसून शोध घेत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या बाहेर पथके पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप बोठे सापडला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी थेट नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान, जरे हत्या प्रकरणात आरोपी बोठेचे नाव हे 3 डिसेंबर रोजी आले. तेव्हापासून बोठे हा पसार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे कसून प्रयत्न सुरू असले तरी त्यांना यश आले नाही. त्यामुळेच आरोपी बोठेला पकडण्यासाठी थेट नागरिकांकडे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. आता याचा कितपत फायदा होणार? याकडे लक्ष लागले आहे.