रेखा जरे हत्याकांड : आठवडाभरात दाखल होणार पुरवणी दोषारोपपत्र

पोलिसांकडून तयारी पूर्ण
रेखा जरे हत्याकांड : आठवडाभरात दाखल होणार पुरवणी दोषारोपपत्र

अहमदनगर (प्रतिनिधी) - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्राची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे. या आठवड्याच्या शेवटी हे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. सुमारे 250 ते 300 पानाचे दोषारोपपत्र असेल, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. यामुळे सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपीविरूद्ध पारनेरच्या न्यायालयात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते.

बोठे याला 102 दिवसानंतर पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली. बोठेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला. नेमकी ही घटना कशी घडली? बोठे याने जरे यांची हत्या का केली? याची माहिती बोठे याने पोलिसांना दिली आहे. बोठे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याचा शोध घेतला आहे. तसेच त्याला मदत करणारे अन्य व्यक्तींचे जाब- जबाब पोलिसांनी नोंदविले आहे. या सर्व बाबीचा उल्लेख पुरवणी दोषारोपपत्रामध्ये असणार आहे.

दरम्यान बोठे पसार झाल्यानंतर तो हैदराबाद येथे लपला होता. त्याठिकाणी त्याला मदत करणारा वकिल जनार्दन अकुला, राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ, पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावरही दोषारोप ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ते मोबाईल, टॅब फॉरेन्सिक लॅबकडेच

बोठे याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईलसह एक टॅब पोलिसांनी त्याच्या घर झडतीमध्ये जप्त केला होता. तसेच त्याने हैदराबादमध्ये एका गुन्हेगाराचा मोबाईल वापरला होता, तो मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. याशिवाय त्याला मदत करणार्‍यांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. हे सर्व मोबाईल, टॅब पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. याबाबत अजून लॅबकडून कोणतीच माहिती प्राप्त झाली नसल्याचे उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com