बाळ बोठेच्या प्रॉपर्टीचे सर्चिंग सुरू

पोलिसांचे नगर, पुणे कलेक्टरांना पत्र
बाळ बोठेच्या प्रॉपर्टीचे सर्चिंग सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) -

रेखा जरे हत्याकांडाचा सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या प्रापर्टीचे सर्चिंग पोलिसांनी सुरू केले आहे. बोठेचे प्रापर्टी कोठे आणि किती

याची माहिती पोलिसांनी नगर आणि पुणे कलेक्टरांकडे मागविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्टँडिंग वॉरंटनंतर बोठे सापडत नसल्याने आता पोलीस प्रापर्टी जप्तीची कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

30 नोव्हेंबरला पुणे रोडवरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येच्या तिसर्‍या दिवशीच पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटकेतील पाच जणांच्या माहितीनुसार पत्रकार बाळ. ज. बोठे हा सूत्रधार असल्याचे समोर आले.

मात्र अटकेपूर्वीच तो नगरमधून पसार झाला. पावणेदोन महिने पसार असलेल्या बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली मात्र तो मिळून आला नाही. लूक आऊट नोटीस आणि नंतर स्टँडिंग वॉरंट मिळवित पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे.

स्टॅडिंंग वॉरंटनंतर त्याची प्रॉपर्टी जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी त्याच्या मालमत्तेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. नगर आणि पुणे कलेक्टरांना पत्र पाठवून त्याच्या मालमत्तेची माहिती पाठविण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.

नगरच्या सेशन कोर्टाने बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात मागील आठवड्यात त्यावर सुनावणी झाली. त्यात कोर्टाने पोलिसांचे म्हणणे मागविले आहे. 28 तारखेला त्यावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. कोर्टाची सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्टॅडिंग वॉरंटनंतर प्रॉपर्टी अटेचमेंट केली जाणार आहे. ती कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यासाठी नगर आणि पुणे कलेक्टरांना पत्र देऊन आरोपी बोठेच्या प्रॉपर्टीची माहिती मागविलेली आहे.

- अजित पाटील, तपासी अधिकारी तथा डीवायएसपी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com