बाळ बोठेविरुद्ध स्टँडिंग वॉरंटसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

रेखा जरे हत्याकांड : जिल्ह्यासह इतरत्र शोधासाठी 45 ठिकाणी छापेमारी
बाळ बोठेविरुद्ध स्टँडिंग वॉरंटसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडात पसार असलेल्या बाळ बोठे याच्याविरोधात स्टँडिंग

वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी हा अर्ज दाखल केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 73, 82 आणि 83 नुसार हा अर्ज आहे. या अर्जामुळे पसार बोठेभोवती कायद्याचा फास अधिकच अवळला गेला आहे. या स्टँडिंग वॉरंटमुळे बोठे याचा शोध राज्यासह इतर राज्यात करणे देखील सोपे होणार आहे. पारनेर येथील न्यायालयात या अर्जावर सोमवार, 4 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली. या हत्याकांडात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हत्याकांडात बाळ बोठे याचे नाव पुढे आले आहे. तेव्हापासून तो पसार आहे. बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी देखील जिल्हा न्यायालयात प्रयत्न केले. जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. बोठे याच्या शोधासाठी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे घातले. सुमारे 45 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी देखील याला दुजोरा दिला. परंतु पोलिसांना बोठेला पकडण्यात यश आले नाही. अजूनही पोलिसांची पथके बोठे याच्या मागावर आहेत. यादरम्यान पोलीस दलाने बोठेभोवती कायद्याचा फास आवळण्याची तयारी केली. जरे आणि बोठे याच्या घराची झडती घेतली आहे. यात पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्याचबरोबर त्याच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविले आहेत.

बोठे याचा उच्च तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या मोबाईलचे लॉक खोलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे जरे यांच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहे. हत्याकांडाच्या दरम्यान झालेल्या मोबाईल संभाषणाचे भक्कम असे तांत्रिक पुरावे तयार केले आहेत. आता पुढील पायरी म्हणून बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 73, 82 आणि 83 नुसार हा अर्ज आहे. या अर्जामुळे बोठे याच्याभोवती कायद्याचा फेरा सुरू झाला आहे. या वॉरंटमुळे बोठे याच्या शोधाचा वेग वाढणार आहे.

काय आहे स्टॅडिंग वॉरंट

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 73 नुसार एखाद्या अजामिनपात्र गुन्ह्यात आरोपी पसार असल्यास आणि अटकेची कारवाई चुकवित असल्यास त्याच्याविरोधात अटकेसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक अधिकारातील कोणतेही व्यक्ती वॉरंट लिहू शकते. अशा व्यक्तीला वॉरंटची लेखी पोच द्यावी लागेल. आरोपीला अटक करून स्थानिक पोलिसांकडे सुपुर्द करता येणार आहे. न्यायालयाचे हे वॉरंट राज्यातील सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल. त्यामुळे पसार बोठे अन्य ठिकाणी जरी दिसला, तरी त्याला अटक करणे सोपे होणार आहे. याचबरोबर आरोपीला फोटो आणि माहितीच्या आधारे नागरिकांनाही आवाहन करता येऊ शकते. यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 82 आणि 83 नुसार मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते. त्यापूर्वी कलम 73 नुसार वॉरंटची प्रक्रिया करावी लागते, असे कायदेविषयक अभ्यासकांनी सांगितले.

...................

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com