बोठेच्या अटकेसाठी गृहमंत्र्यांना पत्र

अ‍ॅड. सुरेश लगड । एसपींना निर्देश देण्याची मागणी
बोठेच्या अटकेसाठी गृहमंत्र्यांना पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याच्या अटकेसाठी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी थेट

गृहमंत्र्यांना पत्र धाडलं आहे. एसपी आणि तपासी अधिकारी डीवायएसपींना बोठेच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रात्री रेखा जरे पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या गुन्ह्याचा सूत्रधार म्हणून नाव निष्पन्न झाल्यापासून बाळ बोठे हा पसार आहे. हत्याकांडातील पाच आरोपींना पोलिसांनी तत्काळ जेरबंद केले, पण सहावा फरार आरोपी बाळ बोठे नगरच्या कार्यक्षम पोलीस दलास सापडत नाही, ही अतिशय गंभीर अशी बाब आहे.

नगर एलसीबीने अनेक सराईत व फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, मात्र डॉक्टर, वकिलीची डिग्री संपादन करणारा मास्टरमाइंड शोध घेऊनही सापडत नाही, ही गंभीर बाब आहे. नगर जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागून आहे. फरार आरोपी गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगर पोलिसांना सापडू शकत नाही हे विशेष वाटते.

अनेक कालावधीपासून फरार असलेले डॉ. निलेश शेळके, रमेश कासार हे पोलिसांना सापडतात मग कायद्याचा उच्चविभुषित पदवीधर आरोपी का सापडू शकत नाही? असा सवाल अ‍ॅड. लगड यांनी पत्रात उपस्थित केला आहे. गुह्याच्या तपासाचा वेग वाढवा, कुठल्याही परिस्थितीत फरारी बोठेच्या मुसक्या आवळण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याचे निर्देश एसपींना द्यावेत अशी मागणी अ‍ॅड. लगड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

एसपींकडून अपेक्षा पण...

कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले मनोज पाटील यांची एसपी म्हणून नगरला पोस्टिंग झाल्याने नगरकरांना आनंद झाला. दोन महिने उलटून गेले तरी बोठेला अटक करण्यात जिल्हा पोलीस दलास यश आले नाही. बोठे असाच फरार राहिला तर समाजात पोलिस दलाविषयीचा चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे बोठेला अटकेसाठी कसोशीने प्रयत्न व्हावेत, तसेच बोठेला अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी तपासी अधिकार्‍यांनी स्वत: कोर्टात उपस्थित रहावे, अशी मागणी अ‍ॅड. लगड यांनी पत्रात केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com