रेखा जरे हत्याकांडाची सोमवारपासून सुनावणी

आठ साक्षीदारांना काढले समन्स
रेखा जरे हत्याकांडाची सोमवारपासून सुनावणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या बहुचर्चित हत्याकांडाची सुनावणी येत्या सोमवारपासून (3 जुलै) जिल्हा न्यायालयात होणार आहे. या सुनावणीसाठी आठ साक्षीदारांना समन्स बजावण्यात आले असून सोमवारी साक्ष देण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आजारी असल्याने जमिनावर सुटका व्हावी अशी मागणी या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याने अर्जाद्वारे न्यायालयास केली होती. मात्र मंगळवारी (27 जून) झालेल्या सुनावणीच्या वेळी त्याने हा अर्ज स्वतःहून मागे घेतला.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात निर्घृण खून झाला आहे. या हत्याकांड प्रकरणात सहा मुख्य आरोपी आहेत. बाळ बोठेसह ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिंदे, आदित्य चोळके, फिरोज शेख, ऋषिकेश पवार व सागर भिंगारदिवे या सहा आरोपींविरुद्ध कलम 302 व 120 ब सह 34 नुसार आरोप निश्चिती झाली आहे तर शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद,आंध्रप्रदेश), अ‍ॅड. जनार्दन अकुला चंद्रप्पा(रा.हैदराबाद) आणि नगरमधील महेश तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी) या पाचजणांवर बोठेला पसार असतानाच्या काळात मदत केल्याने कलम 212 नुसार त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चिती झाली आहे. या प्रकरणात आरोपी बोठेला पसार असतानाच्या काळात मदत करण्याच्या घटनेतील पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला अजूनही पसार आहे.

दरम्यान, रेखा जरे हत्याकांडास अडीच वर्षे झाली आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीची प्रतीक्षा होती. तिला अखेर मुहूर्त लागला आहे. तीन जुलैपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी न्यायालयात होणार आहे. तीन तारखेला साक्ष देण्यास उपस्थित राहावे म्हणून आठ साक्षीदारांना समन्स बजावण्यात आले आहे. या घटनेतील सर्व मुद्देमालही न्यायालयासमोर हजर झाला आहे. त्यामुळे आता नियमित सुनावणीच्या मार्ग मोकळा झाला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com