सुनावणीस सतत गैरहजर राहिल्याने आरोपीविरोधात पकड वॉरंट

न्यायालयाचे आदेश || रेखा जरे खून प्रकरण
सुनावणीस सतत गैरहजर राहिल्याने आरोपीविरोधात पकड वॉरंट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला बाळ बोठे याला पसार असतानाच्या काळात हैदराबाद येथे मदत करणारा जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा. रामनगर,हैदराबाद) याच्या नावाने न्यायालयाने पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश मंगळवारी दिले. चंद्रप्पा व त्याचे वकील या खून प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीस सतत गैरहजर राहत असल्याने जरे कुटुंबीयांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी चंद्रप्पाविरूध्द वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य करून चंद्रप्पा याच्याविरूध्द पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी आता 3 नोव्हेंबरला होणार आहे.

रेखा जरे खून खटल्यातील सर्व 12 आरोपींविरूध्द आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित आहे. तसेच शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुलअरिफ (सर्व रा. आंध्रप्रदेश) या तिघांनी जरे खून खटल्याशी संबंध नसल्याचा दावा करीत या खटल्यातून वगळण्याची मागणीही केली आहे. पण या खटल्याच्या सुनावणीस या आरोपींपैकी कोणीही वा त्यांचे वकीलही हजर राहत नसल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडत चालली आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीस केवळ नगरमधील आरोपी महेश तनपुरे हेच उपस्थित होते. त्यामुळे न्यायालयाने चंद्रप्पाविरूध्द पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले तसेच ज्या तीन आरोपींनी खटल्यातून वगळण्याची मागणी केली, त्यांना युक्तिवादासाठी शेवटची संधी म्हणून 3 नोव्हेंबरला सुनावणी निश्चित केली आहे. या दिवशी या तिघांनी त्यांना या खटल्यातून का वगळावे, याबाबत युक्तिवाद केला नाही तर त्यांचा अर्ज फेटाळण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com